“एक पणती वंचितांच्या दारी ” उमेद फाउंडेशनच्या फराळ- आरोग्य किट वाटपाने दुर्लक्षित,वंचित,भटक्या, कातकरी पाड्यावर आनंदाची दीपावली !

सामाजिक संस्थेकडून, सामाजिक भान आणि फोंडाघाट सेंटरची कर्तव्यपूर्ती सदैव प्रेरणादायी !– संदेश पटेल.

फोंडाघाट/कुमार नाडकर्णी–
नरकचतुर्दशी,अभ्यंगस्नान, आणि लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला फोंडाघाट मधील दुर्लक्षित, वंचित, आणि गरीब, कातकरी समाजातील वस्ती- पाड्यावर जाऊन त्यांची दिवाळी प्रकाशमान आणि गोड व्हावी. या हेतूनेउमेद फाउंडेशन- फोंडाघाट सेंटर कडून प्रत्येक घरठेपी, फराळ आणि स्वच्छता कीट चे वाटप संदेश पटेल- सावंत, संजय सावंत, सुनील चव्हाण, निलेश सावंत इत्यादी मान्यवरांचे हस्ते त्यांच्या वस्ती पाड्यावर जाऊन करण्यात आले .

सध्या भात कापणीचा हंगाम जोरात चालू असल्याने, घरातील पुरुष मंडळी शेतात होती. त्यामुळे ही फराळ भेट घरोघरीच्या महिलांकडे देण्यात आली. आणि त्यांना स्वच्छतेकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उमेद फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करताना, माजी कृषी सभापती संदेश सावंत – पटेल यांनी हा उपक्रम फोंडाघाट मध्ये राबविणार्‍या उमेद फाउंडेशन फोंडाघाट सेंटरचे शिक्षक सदस्यांचे कौतुक केले. समाजात एकमेकांसाठी काम करणारे बरेच असतात. त्यातही कातकरी वंचित समाजाकरिता त्यांच्या संघटनाही कार्यरत असतात. परंतु सामाजिक बांधिलकी जोपासत मानवतेची खरी ओळख- संस्कार जोपासणारे उमेद फाउंडेशनचे हे कार्य दीपस्तंभ ठरावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या गोड स्वच्छता व फराळ भेटवस्तूमुळे वस्तीपाड्यावरील मुलांच्या आणि महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची दिपवाळी दिसून आली.