कणकवली | मयुर ठाकूर : दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली येथील एस एम हायस्कूल येथील परीक्षा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या भेटी दरम्यान परीक्षा केंद्रावरील आसनव्यवस्था, प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या इतर सोयी- सुविधांची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी माहिती घेतली. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही तणावाखाली न येता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, तसेच केंद्र प्रशासनाने नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी केंद्रप्रमुख, शिक्षक व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.












