3 लाख 45 हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त!
अवैध दारूविक्रीविरोधात आणखी एक मोठी कारवाई
कोतेवाडा येथील संशयितावर कारवाई
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाची धडक मोहीम
मालवण | प्रतिनिधी : मालवण परिसरातील अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरूच असून, मालवण शहरात पोलिसांनी आणखी एक छापा टाकून तब्बल ३ लाख ४५ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. शनिवारी, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आनंद भालचंद्र मुणगेकर (रा. कोतेवाडा, मालवण) यांच्यावर संशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे.
मालवण परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांकडून सातत्याने धडक कारवाया करण्यात येत आहेत. याच मोहिमेअंतर्गत शनिवारी रात्री छापा टाकण्यात आला. या कारवाईत गोवा बनावटीचा ३ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भोसले, हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार आणि हेड कॉन्स्टेबल वृषाली पाटील यांचा सहभाग होता.













