रत्नागिरी : दिवाळीच्या आनंदात असताना रत्नागिरी शहरात प्रामाणिकपणाचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. येथील टीआरपी परिसरामध्ये दोन तरुणांना १५ हजार रुपयांची रोकड, कार्ड आणि बँक एटीएम असलेले एक पाकीट सापडले. या दोन्ही तरुणांनी कोणतीही लालसा न बाळगता ते पाकीट पोलीस प्रशासनाच्या मदतीने मूळ मालकापर्यंत पोहोचवले, ज्यावरून त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवाजीनगर येथील गुरुप्रसाद सावंत आणि त्यांचे मित्र अभिजित भिंगार्डे हे दोन्ही टीआरपी परिसरातून जात असताना त्यांना मुख्य रस्त्यावर हे पाकीट पडलेले आढळले. त्यांनी पाकीट उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये १५ हजार रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कार्डवरील पत्त्याच्या आधारे संबंधित कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या सुमारास हे पाकीट मूळच्या दाभोळे बुद्रुक येथील आणि सध्या रत्नागिरीत वास्तव्य असलेल्या प्रणाली कोलापटे-झोरे यांचे असल्याचे निष्पन्न झाले.
याची खात्री पटल्यानंतर तरुणांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना याबाबतची सर्व माहिती दिली. दिवाळीच्या पवित्र दिवशी शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक आर. एस. घाटगे आणि पोलीस हवालदार राकेश तटकरी यांच्या उपस्थितीत रोख रक्कम व कागदपत्रे पाकीट मालक प्रणाली कोलापटे-झोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
संपूर्ण रकमेसह सुरक्षितपणे मिळाल्यामुळे झोरे कुटुंबीयांनी गुरुप्रसाद सावंत आणि अभिजित भिंगार्डे यांचे मनापासून आभार मानले. तसेच पोलीस निरीक्षक विवेक पाटील व पोलीस उपनिरीक्षक आर. एस. घाटगे यांनी या दोन्ही तरुणांच्या प्रामाणिकपणाचे जाहीर कौतुक करत त्यांना धन्यवाद दिले. आजच्या काळातही मानुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे.
Home महत्वाच्या बातम्या प्रामाणिकपणा अजूनही जिवंत! दिवाळीच्या दिवशी तरुणांनी दाखवली माणुसकी, पोलीस प्रशासनाकडूनही कौतुक













