सिंधुदुर्ग : युवकांच्या सामाजिक सहभागातून आनंद आणि आपलेपणाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने YONE Foundation च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पणदूर येथील संविता आश्रम येथे आज ‘Mission आनंदाचे सूर’ या विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
YONE Foundation चे संस्थापक समीर अशोक जाधव व त्यांचे सहकारी यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन केले. संगीत, विविध मनोरंजक खेळ आणि संवाद यांच्या माध्यमातून आश्रमातील लोकांसोबत आनंदाचे क्षण घालवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शायरी व संगीताने झाली. त्यानंतर आश्रमातील लोकांसाठी विविध सोपे आणि मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आले. युवकांनी आश्रमातील प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधत त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले. संगीत, हास्यविनोद आणि सामूहिक सहभागामुळे कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ मनोरंजन करणे नसून ज्येष्ठ नागरिक आणि आश्रमातील रहिवाशांना वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे हा होता.
‘समाजसेवा म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर एखाद्याला आपला वेळ देणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे,’ हा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
YONE Foundation चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असून संस्थेच्या सामाजिक कार्याच्या विस्ताराच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
युवकांच्या कला, संगीत आणि सामाजिक जाणीवांचा उपयोग समाजातील विविध घटकांच्या आनंदासाठी व्हावा, या उद्देशाने YONE Foundation भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करणार आहे.
‘For the Youth. By the Youth. With the Youth.’ या ब्रीदवाक्याने प्रेरित YONE Foundation युवकांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे.











