भक्तीमय वातावरणात सांस्कृतिक परंपरेचे जतन ; जिंकली रसिकांची मने
माडखोल । लखन आडेलकर : दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून बावळाट-मुलांडावाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘संगीत संध्या’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात गावच्या मातीतील भजनाचा वारसा मोठ्या दिमाखात अनुभवयास मिळाला. गावातील स्थानिक नवोदित कलाकारांनी आपल्या सुमधुर गायनाने आणि वादनाने उपस्थितांची मने जिंकली. सर्व कलाकार स्थानिक असल्याने या कार्यक्रमाला एक वेगळीच आपुलकी आणि जिव्हाळ्याची रंगत प्राप्त झाली होती.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुरेल झाली, ज्यामध्ये नारायण सावंत, गोपाळ साहिल, महादेव राऊळ, रोहित सावंत आणि प्रज्योत सावंत यांनी आपल्या भारदस्त स्वरात गायन केले. या सुमधुर गायनाला साथ देताना विशाल सावंत यांनी हार्मोनियमची उत्तम साथ संगत केली. तसेच रामकृष्ण ठाकूर यांच्या पखवाजाच्या निनादात आणि रुतिक सावंत यांच्या तबला वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. टाळची साथ गुरुनाथ साहिल यांनी दिली, तर अनिल सावंत यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन पार पाडले.
भजन, अभंग आणि भावगीतांच्या सुरेल सादरीकरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. ग्रामस्थांचा व रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभल्यामुळे शेवटपर्यंत प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. गावच्या नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि आपली समृद्ध भजन परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.













