महिला सक्षमीकरणाला नवी दिशा
गुहागर प्रतिनिधी :
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या घरगुती फराळाच्या विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. महिलांच्या हाताला काम, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला आणि आर्थिक स्वावलंबनाला चालना देणारा हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत बचत गटांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या महिलांनी आपल्या मेहनतीतून तयार केलेल्या फराळाच्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.
स्वामिनी महिला प्रभाग संघ पालशेत यांच्या अंतर्गत विघ्नहर्ता महिला बचत समूह शृंगारतळी, भैरी भवानी स्वयंसहायता बचत गट, सीया फुड्स शृंगारतळी, श्रीजा महिला उत्पादक महिला समूह पालशेत बारभाई, सदगुरु कृपा महिला बचत गट जानवळे, ज्योत महिला ग्राम संघ पोमेंडी, श्री महालक्ष्मी स्वयंसहायता समूह पोमेंडी रांगळेवाडी, श्री महाकाली स्वयंसहायता बचत गट, हिरकणी महिला ग्राम संघ आदी महिला बचत गटांच्या महिलांनी शृंगारतळी बाजारपेठेत दिवाळी फराळाचे स्टॉल मांडले आहेत.
या स्टॉलवर चकली, लाडू, बोर, करंजी, शंकरपाळी, चिवडा तसेच विविध प्रकारचे पीठ यांसह दिवाळी फराळाचे अनेक पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महिलांनी आपल्या कौशल्याचा आणि मेहनतीचा उपयोग करून तयार केलेल्या पदार्थांच्या विक्रीतून त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.पूर्वी घराच्या चार भिंतींमध्ये मर्यादित असणाऱ्या अनेक महिला आज बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येऊन विविध उद्योग, व्यवसाय आणि उत्पादनांच्या विक्रीत सक्रिय सहभाग घेत आहेत. घरगुती पदार्थ तयार करण्याचे कौशल्य आता उत्पन्नाचे साधन बनू लागले आहे. त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढण्याबरोबरच त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळत आहे.
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात मोठ्या व्यावसायिक दुकानांबरोबरच महिला बचत गटांच्या उत्पादनांनाही ग्राहकांनी प्राधान्य देणे आवश्यक आहे.
शृंगारतळी बाजारपेठेत उभारण्यात आलेले हे दिवाळी फराळाचे स्टॉल म्हणजे महिलांच्या जिद्दीचे, मेहनतीचे आणि स्वावलंबनाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीचे प्रतीक आहेत. अशा उपक्रमांना समाजातील प्रत्येक घटकाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
दरम्यान, शृंगारतळी परिसरातील नागरिकांनी तसेच दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांच्या घरगुती फराळाच्या पदार्थांची खरेदी करावी आणि महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन बचत गटांच्या वतीने करण्यात आले आहे.













