अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील गाभाऱ्यात दिपावली लक्ष्मीपूजन संपन्न.

मसुरे | झुंजार पेडणेकर :      दिपावलीच्या पावन पर्वावर अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्वामींच्या गाभाऱ्यात नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. यावेळी मंदिर फुलांनी, दिव्यांनी आणि रोषणाईने उजळून निघाले होते.

मंदीर समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली पुरोहित मंदार महाराज यांच्या हस्ते पहाटे ५ वाजता काकड आरती व सकाळी ११:३० वाजता श्री स्वामी समर्थांची नैवेद्य आरती व सायकाळी ७ वाजता लक्ष्मीपुजन संपन्न झाले.

यावेळी स्वामींच्या मूर्तीला व लक्ष्मीच्या मुर्तीला आकर्षक वस्त्रालंकार, फुलांच्या माळा, हार घालून मनमोहक सजावट करण्यात आली होती. गाभाऱ्यात फळे, नैवेद्य, दिवे यांनी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनाचा माहोल अधिकच मंगलमय झाला होता. या प्रसंगी देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी श्री स्वामी समर्थांचे व माता लक्ष्मीचे दर्शन घेऊन सर्व भाविकांच्या सुख, समृद्धी व भरभराटीसाठी प्रार्थना केली. लक्ष्मी पूजनासाठी अक्कलकोटसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी स्वामींच्या गाभाऱ्यातील हे दिव्य रूप पाहून धन्य झाल्याची भावना व्यक्त केली. सायंकाळी ७.४५ वाजता नेहमीप्रमाणे महाराजांची शेजारती संपन्न होऊन भाविकांना प्रसाद वाटण्यात आला. यावेळी प्रथमेश मालक इंगळे, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश महाराज पुजारी, मोहित महाराज पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, सागर गोंडाळ, श्रीपाद सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार, गिरीश पवार आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.