आंबोलीत मूलांनी घडविला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला

मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा वारसा जपण्यासाठी मुलांचा पुढाकार

आंबोली । प्रतिनिधी : दिवाळीत दरवर्षी विविध गडकिल्ले साकारण्याची शेकडो वर्षांची गौरवशाली परंपरा ही आजही सर्वत्र तेवढ्याच उत्साहात जोपासलेली दिसते. यंदाही आंबोली गावठण मधील अंश निलेश धुरी, रोहन संतोष राऊत व आदिती अरुण राऊत यांनी आकर्षक असा छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला (जलदुर्ग) ची प्रतिकृती साकारली आहे. त्यांचा तो आकर्षक असा जलदुर्ग पाहून सर्वजण त्यांचे विशेष कौतुक करत आहेत.

महाराष्ट्रात दिवाळी सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर गडकिल्ले साकारणे ही संकल्पना प्रामुख्याने पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या अतिशय समृद्ध इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मराठी स्वराज्य आणि त्यांनी जिंकलेले किंवा बांधलेले गडकिल्ले यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचा वारसा जपण्यासाठी आणि त्यांना आदरंजली वाहण्यासाठी ही प्रथा साजरी केली जाते. या अनोख्या परंपरेमागील इतिहास, महत्त्व आणि स्वरूप हेही शिवरायांच्या बालपणाशी संबंधित असून छत्रपती शिवाजी महाराज स्वतः बालपणी त्यांच्या सवंगड्यांसोबत मातीचे लुटुपुटुचे किल्ले बनवत असत. वास्तविक इतिहास पाहता, पावसाळ्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोहिमा थांबत असत. दसरा-दिवाळीच्या काळात पाऊस ओसरल्यावर मराठा सैन्य पुन्हा नवीन मोहिमांवर आणि गडकिल्ल्यांच्या संरक्षणासाठी सज्ज व्हायचे. या ऐतिहासिक घडामोडींची आठवण म्हणून दिवाळीत किल्ले बनवण्याची प्रथा रूढ झाली असावी, असेही मानले जाते. सोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील असून किल्ला हे शौर्य, सुरक्षितता आणि ध्येयाचे प्रतीक मानले जाते. दिवाळीत घर धनधान्याने आणि समृद्धीने नटलेले असते, या समृद्धीचे रक्षण करण्यासाठी घराबाहेर ‘किल्ला’ (संरक्षक कवच) उभारला जातो. यासह दिवाळीची पहिली पणती अनेकदा अंगणातील या मातीच्या किल्ल्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर लावून सणाची सुरुवात केली जाते.

या इतिहासाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी लहान मुले (चिमुकले) दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घराबाहेर किंवा गल्लीमध्ये मातीचे किल्ले तयार करतात. हे फक्त गडकिल्ले उभारणे सुद्धा आजच्या काळात मुलांमधे पुरातन परंपरा, संस्कार यासह मुले एकत्र येऊन काम करतात, ज्यामुळे त्यांच्यात एकोपा आणि संघभावना सुद्धा वाढीस लागते. तसेच किल्ला कसा असावा, बुरूज कुठे बांधावा, पाण्याचा टाके कुठे असावे, याचे नियोजन करताना मुलांच्या कल्पकतेला देखील वाव मिळतो. किल्ल्यांची निर्मिती आणि सजावट यासाठी बच्चेकंपनी एकत्र येऊन दगड, विटा आणि मातीचा वापर करून किल्ल्याची तटबंदी, बुरूज आणि दरवाजे तयार करतात. त्याच किल्ल्याच्या कड्यांवर किंवा उतारावर मोहरी किंवा गव्हाचे दाणे पेरले जातात. काही दिवसांतच तिथे छान हिरवेगार गवत उगवते, ज्यामुळे किल्ल्याला जिवंतपणा येतो. सोबतच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, सैनिक, तोफा आणि हत्ती-घोडे यांच्या लहान मातीच्या मूर्ती मांडल्या जातात.

दरम्यान, आंबोली सारख्या पर्यटनस्थळी दिवाळी हंगामात गडकिल्ले उभारणे देखील एक वेगळीच सर्वांसाठी अनुभूती असते. दरवर्षी आंबोली परिसरात पुरातन पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या परंपरा ह्या तेवढ्याच उत्साहात साजरे होतात. यात नवी पिढीला घरची मंडळी सुद्धा विशेष साथ देतात. यंदाही परंपरे नुसार येथील गावठण मधील अंश निलेश धुरी, रोहन संतोष राऊत आणि आदिती अरुण राऊत यांनी मिळून आकर्षक असा पर्यावरण पूरक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक असा जलदुर्ग उभारला आहे. यात हुबेहूब देखावा, मावळे, समुद्र, नौका व आदी यांची सुंदर प्रतिकृती तयार केलेली आहे. त्यांनी बनवलेला किल्ला पाहून सर्वच नागरिक व पर्यटक हे त्यांचे विशेष कौतुक हे सद्या करत आहेत. तर अंश, रोहन आणि आदिती हे तिघंही दरवर्षी विविध गडकिल्यांची प्रतिकृती साकारत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाची वदंना देतात. अंश धुरी हा युनियन इंग्लिश स्कुल आंबोली तर रोहन राऊत सद्या आरोंदा हायस्कुल आरोंदा यांचे विद्यार्थी आहेत.