चिमुकल्यांचा किल्ले बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
वेंगुर्ले : दाजी नाईक
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या अणसूर गावात श्री देवी सातेरी कला क्रीडा मंडळ, अणसूर यांच्यावतीने प्रथमच किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा लहान आणि मोठ्या अशा दोन गटात घेण्यात आली. चिमुकल्यांचा किल्ले बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग, राजगड, शिवनेरी अशा विविध किल्ल्यांच्या उभारणीमुळे अणसूर गावात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही अवतरल्याचे चित्र दिसत आहे.
मुलांना इतिहासाची माहिती मिळावी. या उद्देशाने दिवाळीच्या निमित्ताने हे किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या गटात ५ आणि लहान गटात ७ अशा एकूण १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये मुलांनी रायगड, पुरंदर, हरिहरगड, मल्हारगड, मुरुड जंजिरा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, प्रतापगड अशा गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती हुबेहूब साकारल्या होत्या. मुलांच्या कल्पकतेला आणि मेहनतीला परीक्षकांनी मोठी दाद दिली. स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. परीक्षक म्हणून गिरेश्वर विकास सोसायटीचे सचिव व नेमळे हायस्कूलचे शिक्षक श्री. पांडुरंग दळवी, वजराट यांनी काम पाहिले.
या स्पर्धेमध्ये मोठ्या गटात भास्कर तुळशीदास गावडे (पुरंदर किल्ला) प्रथम क्रमांक प्रज्ञेश प्रमोद गावडे, (सिंधुदुर्ग किल्ला) द्वितीय क्रमांक. तर लहान गटात हर्ष आनंद राणे (रायगड किल्ला) प्रथम क्रमांक, सिद्धार्थ नितीन अनसुरकर (राजगड किल्ला) द्वितीय क्रमांक आणि दक्ष नितेश गावडे (शिवनेरी किल्ला) याने तृतीय क्रमांक पटकावला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नितीन अणसुरकर, सिद्धेश (चिन्या) गावडे, गजमुख गावडे, सुनील गावडे, नंदन ताम्हणकर, अनिकेत ताम्हणकर, वैभव वारंग, सागर गावडे, भाऊ गावडे आणि सर्व मंडळाचे कार्यकर्ते, अणसूर ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेला अणसूर सरपंच श्री. सत्यविजय गावडे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच नितीन अणसुरकर यांनी सर्व स्पर्धेकांचे कौतुक करून त्यांच्या सहभागाबद्दल आभार मानले.













