तोंडवळी प्राथमिक शाळेच्या मुलांनी बनवलेल् इको फ्रेंडली आकाशकंदिलांच्या विक्रीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

विद्यार्थ्यांच्या उद्योगशीलतेला पालक व ग्रामस्थांची उत्स्फूर्त साथ

आचरा-अर्जुन बापर्डेकर

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोंडवळी वरची येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी इको फ्रेंडली आकाशकंदिलांची विक्री आयोजित करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून, मेहनतीतून आणि कौशल्यातून आकर्षक, रंगीबेरंगी व पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार केले होते. विद्यार्थ्यांच्या या उद्योगशीलतेला पालकांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत खरेदीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. पालकांनी विद्यार्थ्यांच्या छोट्या उद्योगाचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने आकाशकंदील खरेदी करून या उपक्रमाला भरभरून साथ दिली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रवीण पाटील, श्री. मालोजी (अना) हडकर, श्री. सुहास चेंदवणकर, श्री. अमित पाटील, सौ. रूपाली पेडणेकर, सौ. धरती पुजारी, सौ. लाड, श्री. अवधूत कांदळकर, श्री. दत्ताराम परब, श्री. रमेश मसुरकर आदी पालक व ग्रामस्थांनी विक्रीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता परब, सहकारी शिक्षिका श्रीमती सोनल कदम व श्रीमती विभा ठाकूर तसेच स्वयंसेविका श्रीमती अंजली मालंडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, आर्थिक साक्षरता, स्वावलंबन, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली. विद्यार्थ्यांच्या उद्योगशीलतेला पालक व ग्रामस्थांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रोत्साहन हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

‘विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ, उद्योगशीलतेला प्रोत्साहन आणि पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश!’

अशा या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.