हजारो दिव्यांची रोषणाई आणि आकर्षक विद्युत सजावटीमुळे संपूर्ण गड परिसर उजळून निघाला
शिवसंघर्ष संघटनेचा उपक्रम
राजापूर प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पदस्पर्शाने पावन झालेल्या नाटे येथील प्रसिद्ध घेरा यशवंतगडावर दिवाळी सणानिमित्त शिवसंघर्ष संघटनेच्या वतीने भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांची रोषणाई आणि आकर्षक विद्युत सजावटीमुळे संपूर्ण गड परिसर उजळून निघाला. या दीपोत्सवातून शिवप्रेमींच्या मनातील शिवरायांप्रती असलेली श्रद्धा आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांविषयीची आत्मीयता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
शिवसंघर्ष संघटना, नाटे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवासाठी शिवभक्त आणि मावळ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. दिव्यांच्या प्रकाशाने नटलेला ऐतिहासिक गड आणि त्यावरील आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे परिसरात दिवाळीचा आनंददायी आणि उत्साहपूर्ण माहोल निर्माण झाला होता. गडाचे ऐतिहासिक वैभव आणि दीपोत्सवाची रोषणाई यांचा सुंदर मिलाफ पाहण्यासाठी उपस्थित शिवप्रेमी भारावून गेले.
यावेळी उपस्थित शिवभक्त आणि मावळ्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा गगनभेदी घोषणा देत संपूर्ण गड परिसर दुमदुमून सोडला. शिवरायांच्या जयघोषाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले. दीपोत्सवानंतर सहभागी मावळ्यांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते.
ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि शिवशौर्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांना विशेष महत्त्व आहे. शिवसंघर्ष संघटनेने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे नाटे ग्रामस्थांसह शिवप्रेमींकडून कौतुक होत आहे. ‘नाटे गावातील शिवरायांच्या मावळ्यांनो, तुमच्या या उपक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,’ अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.













