‘जीवन प्रमाण’ ॲपद्वारे ओटीपी आणि फेस ऑथेंटिकेशनची सुविधा;
१६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान तालुकानिहाय मेळावे
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी आता बँक किंवा कोषागार कार्यालयात जाण्याची गरज नाही. अँड्रॉइड मोबाईलवर ‘Jeevan Pramaan’ ॲप डाऊनलोड करून ओटीपी आणि फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून घरबसल्या डिजिटल हयातीचा दाखला अर्थात जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. सिंधुदुर्गात ९४०० कोषागार निवृत्तीधारक असून डिजिटल जीवन प्रमाणपत्र शंभर टक्के पूर्ण व्हावे, यासाठी १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान तालुकानिहाय विशेष मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी देत या सर्व सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारने निवृत्तीवेतनधारकांची ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि सर्व पात्र लाभार्थ्यांचे देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र ॲप द्वारे करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी अभियान ५ मध्ये सर्व निवृत्तीवेतनधारकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा कोषागार अधिकारी अरुणा हजबे उपस्थित होत्या.
कार्मिक, लोकशिकायत व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात निवृत्तीवेतन नियमित सुरू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक असते. मात्र, डिजिटल सुविधेमुळे आता ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ झाली आहे. अँड्रॉइड मोबाईलमध्ये ‘Jeevan Pramaan’ ॲप डाऊनलोड करून आवश्यक नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ओटीपी व चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication) तंत्रज्ञानाद्वारे स्वतःचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करता येते. त्यामुळे ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
ज्यांना मोबाईलद्वारे स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करणे शक्य नाही, अशा निवृत्तीवेतनधारकांना संबंधित बँक शाखा, जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीने डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येईल.
आठ तालुक्यांत विशेष मेळावे
जिल्हा कोषागार कार्यालय, उपकोषागार कार्यालये, बँका आणि पेन्शनर संघटनांच्या समन्वयातून १६ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबरला सावंतवाडी व कणकवली, १७ नोव्हेंबरला मालवण व कुडाळ, १८ नोव्हेंबरला वेंगुर्ला व देवगड, तर १९ नोव्हेंबरला वैभववाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखांमध्ये मेळावे होणार आहेत. दोडामार्ग तालुक्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी १९ नोव्हेंबरला साटेली-भेडशी येथील स्टेट बँक शाखेत मेळावा आयोजित केला आहे. सर्व मेळावे सकाळी १०.३० वाजता सुरू होतील.
आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत
मेळाव्याला उपस्थित राहताना निवृत्तीवेतनधारकांनी पीपीओ क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. डिजिटल प्रमाणपत्र सादर करताना नाव, आधार क्रमांक, बँक खाते व पीपीओ क्रमांक अचूक नोंदविणे आवश्यक आहे. वितरण संस्था म्हणून ‘Maharashtra State Treasury’ आणि संबंधित कोषागार म्हणून ‘Sindhudurg DTO’ यांची योग्य निवड करावी.
अधिक माहिती व सहाय्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, संबंधित उपकोषागार कार्यालय किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधावा. डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या माध्यमातून चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे आणि निवृत्तीवेतनधारकांची प्रक्रिया सुलभ करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोषागार निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.












