Lanja truck and lixury bus accident : ट्रकची पाठीमागून धडक: ३० जण जखमी

मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी पुलाजवळ भीषण अपघात,

संतोष कोत्रे
लांजा-: अंजनारी पुलावर अपघाताची मालिका सुरू असून आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ट्रकने खाजगी लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे चालकासहित ३० जण जखमी झाले आहेत.
दरम्यान सर्व जखमींना लांजा ग्रामीण रुग्णालय पाली ग्रामीण रुग्णालय आणि गंभीर रुग्णांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने लक्झरी बसला मागून धडक दिली. पहिल्या धडकेनंतर काही क्षणातच या ट्रकची बसला दुसऱ्यांदा जोरदार धडक बसली, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्यावरच पलटी झाली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, पलटी झालेली बस महामार्गावर तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत गेली.
अपघाताची माहिती मिळताच हातखंबा आणि लांजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

या अपघातातील सर्व ३० जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, पाली आणि लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या ८ प्रवाशांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम हाती घेतले. सकाळी सात वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली, .