राजापूर प्रतिनिधी राजापूर तालुक्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरती २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी चिपळूण येथे ही परीक्षा होणार होती. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा १७ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
राजापूर तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाकडून १३ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरती २०२६ साठी अर्ज दाखल केलेल्या व परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना ही सूचना देण्यात आली आहे. शासनाच्या १२ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयातील वयोमर्यादेच्या शिथिलतेबाबतच्या अभिप्रायाचा विचार करून कोकण विभागातील १५ नोव्हेंबर रोजी नियोजित लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यानुसार सुधारित वेळापत्रकानुसार १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नव्या तारखेनुसार नियोजन करावे लागणार आहे.
या बदलाची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महसूल सेवक (कोतवाल) निवड समितीचे सचिव तथा राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे. सदर सूचना तहसीलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.












