मुंढे येथे ट्रकच्या धडकेत सांबर जखमी

 माजी उपसरपंच नागेश सोलकर, मयुर खेतले तत्परता!

 वन विभागाच्या मदतीने जखमी सांबराला मिळाले जीवदान

चिपळूण (प्रतिनिधी) : गुहागर-विजापूर मार्गावरील मुंढे येथील रस्त्यावर ट्रकच्या धडकेत एक सांबर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच शिरगावचे माजी उपसरपंच नागेश सोलकर यांनी तत्परता दाखवत युवकांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे जखमी वन्यप्राण्याला वेळेत मदत मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर-विजापूर मार्गावरील मुंढे रस्त्यावरून जात असताना एका ट्रकची सांबराला जोरदार धडक बसली. या अपघातात सांबर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. ही माहिती शिरगावचे माजी उपसरपंच नागेश सोलकर यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता काही युवकांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी सांबराची परिस्थिती पाहून तातडीने वन विभागाला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत जखमी सांबराला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला चिपळूण येथे हलविण्यात आले.