आंबा-काजूच्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी!
सकाळी आटोक्यात आलेल्या आगीचे दुपारनंतर रौद्ररूप

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आडारी माळरानावर लागलेल्या भीषण वणव्याने आडारी, खैदा आणि न्हीवे परिसरातील आंबा-काजूच्या बागांचेही मोठे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात होती, कडाक्याचे ऊन आणि आगीच्या वाढत्या तीव्रतेमुळे वणव्याने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. या आगीत ढोलम, पाटकर, करलकर, पाताडे, लाड, आचरेकर यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या आंबा-काजू कलमांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वर्षानुवर्षे मेहनत घेऊन जोपासलेल्या बागा डोळ्यांदेखत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
आडारी माळरानावर आग लागल्याचे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी तातडीने मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्याशी संपर्क साधला. आगीचा वाढता धोका लक्षात घेऊन अग्निशमन बंब पाठविण्याची मागणी केली. या मागणीची तत्काळ दखल घेत नगराध्यक्षा वराडकर यांनी विलंब न करता अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे सकाळच्या सत्रात आगीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले.
मात्र, कडाक्याचे ऊन आणि माळरानावर चारही बाजूंनी पसरणाऱ्या आगीमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. आगीचे लोट वेगवेगळ्या दिशांनी पसरत असल्याने एकाच अग्निशमन बंबाच्या साहाय्याने संपूर्ण परिसरातील आग आटोक्यात आणणे आव्हानात्मक ठरत होते. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
*दुपारनंतर पुन्हा भडका; हिरव्यागार बागांची राखरांगोळी!*
सकाळी काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या आगीने दुपारनंतर पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले. काही वेळातच वणव्याचे लोट आडारी, खैदा आणि न्हीवे माळरान परिसरात पसरले. या आगीच्या तडाख्यात आंबा-काजूच्या बागांमधील अनेक कलमे जळून खाक झाली. आपल्या डोळ्यांदेखत हिरव्यागार बागांची राखरांगोळी होत असल्याचे पाहून शेतकरी हतबल झाले. अनेक वर्षे कष्टाने वाढविलेल्या कलमांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
*अनेक शेतकऱ्यांना फटका; तलाठ्यांकडून नुकसानीची पाहणी*
या वणव्यात ढोलम, पाटकर, करलकर, पाताडे, लाड आणि आचरेकर यांच्यासह परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या आंबा-काजू बागांचे नुकसान झाले आहे. आगीची तीव्रता मोठी असल्याने नुकसानीचे नेमके प्रमाण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच तलाठ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.













