खानोली सोसायटीने उत्पन्नवाढीसाठी आंबा-काजू खरेदीसह नवनवीन उपक्रम राबवावेत : जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

खानोली सोसायटीच्या नूतन इमारतीचे थाटात लोकार्पण

वेंगुर्ले : दाजी नाईक
खानोली सोसायटीने स्वतःची भव्य आणि सुसज्ज इमारत उभी करून सहकार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. मात्र, केवळ इमारत उभारण्यापुरते संस्थेचे काम मर्यादित न राहता संस्थेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठीही आता नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे. सोसायटीने पारंपरिक कामकाजासोबतच बदलत्या काळाची गरज ओळखून उत्पन्नवाढीचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजेत.संस्थेमार्फत आंबा खरेदी, काजू खरेदी यांसारखे उपक्रम सुरू करून स्थानिक शेतकरी आणि बागायतदारांना सहकार्य करता येईल. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच संस्थेच्याही उत्पन्नात वाढ होईल. यासाठी दूरदृष्टी ठेवून नियोजन करावे आणि सहकाराच्या माध्यमातून गावाच्या आर्थिक विकासाला चालना द्यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.

श्री सिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित, खानोली या संस्थेच्या नूतन भव्य इमारतीचा शुभारंभ सोहळा शनिवार १४ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी यांच्या हस्ते फीत कापून या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यानिमित्ताने दुपारी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, संस्थेचे चेअरमन प्रशांत प्रभूखानोलकर, पंचायत समिती सदस्या शितल राऊत-बांदवलकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, पाल सोसायटीचे चेअरमन कमलेश गावडे, इमारत बांधकामासाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या सौ. खानोलकर तसेच महेश प्रभूखानोलकर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ तसेच वसंत तांडेल, सुधाकर खानोलकर, सुरेश कामत, संस्थेचे माजी चेअरमन विद्याधर प्रभू, सिद्धेश्वर प्रभू, माजी सरपंच श्याम मुणणकर, प्रणाली खानोलकर, बाळा सावंत, प्रदीप सावंत, संजू प्रभू, सुधीर सावंत, किरण प्रभू, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की, वेंगुर्ले तालुक्यात ज्या सहकारी सोसायट्यांच्या अद्याप स्वतःच्या इमारती नाहीत, अशा सर्व संस्थांच्या ही लवकरच स्वतःच्या हक्काच्या इमारती उभ्या यासाठी प्रयत्न केले जातील. येत्या काळात तालुक्यातील अधिकाधिक सहकारी संस्थांच्या स्वतःच्या इमारती उभ्या राहतील, असा विश्वासही जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करताना श्री सिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या कार्याचे आणि नूतन इमारतीच्या उभारणीचे कौतुक केले. संस्थेने भविष्यातही सहकार क्षेत्रात अशीच प्रगती करावी, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश प्रभूखानोलकर यांनी तर आभार आनंद दाभोलकर यांनी मानले. नूतन इमारतीच्या लोकार्पणामुळे खानोली सहकारी संस्थेच्या वाटचालीत एक नवा अध्याय सुरू झाला आहे.