मुंबई गोवा महामार्गावर देवधे येथील घटना
लांजा (प्रतिनिधी): दुचाकी स्वाराला वाचवताना कार महामार्ग लगत च्या खड्ड्यात कलंडली. यामध्ये दुचाकी स्वाराच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर देवधे येथे घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैभव हनमंत पालेकर (वय ४३, रा.सुकापूर नवीन पनवेल, ता.जि.रायगड) हे आपल्या ताब्यातील होंडा सिटी चारचाकी गाडी (एमएच.०६.सीडी.१८१०) ने पनवेल ते तारकर्ली मालवणला जात होते. त्यांच्या सोबत पत्नी व मुलगा होता. देवधे फाटा येथे कार आली असता प्रमोद प्रभाकर भुते (वय ५२, रा.मांडवी बंदररोड रत्नागिरी, ता.जि.रत्नागिरी) व पत्नी पूजा प्रमोद भुते (वय ४९) हे आपल्या ताब्यातील (एमएच.०८.बीबी.९५४१) होंडा कंपनीची ऍक्टिव्हा दुचाकीने पुनस फाट्यावरून हायवे क्रॉस करत बाहेर येऊन देवधे फाटा येथे आत जात होते.
महामार्गावर कारच्या समोर अचानक दुचाकी समोर आल्याने त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कार महामार्गा लगतच्या खड्ड्यात जाऊन कलंडली.
यामध्ये कालचालक यांची पत्नी किरकोळ जखमी झाली. तर दुचाकी स्वार प्रमोद भुते यांच्या डोक्याला मार लागल्याने जखमी झाले होते. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.













