चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील खेर्डी येथील एका राईस अँड पोहा मिलमध्ये झोपण्यासाठी ठेवलेल्या खाटेवर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या ४० वर्षीय कामगाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शनिवार दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजेश हनुमंत पाटील (४०, रा. दत्त राईस अँड पोहा मिल, खेर्डी, चिपळूण) असे मयत कामगाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजेश पाटील हे खेर्डी येथील दत्त राईस अँड पोहा मिलमध्ये कार्यरत होते आणि तेथेच वास्तव्यास होते. शनिवारी सकाळी मिलच्या ठिकाणी झोपण्यासाठी ठेवलेल्या खाटेवर ते बेशुद्ध अवस्थेत झोपलेले मिलच्या मालकांना दिसून आले. ही बाब लक्षात येताच मिल मालकांनी तात्काळ तेथील कामगार मेहराज इब्राहिम शेख, मयताची पत्नी अस्मिता राजेश पाटील आणि त्यांची आई कमल यांना याबाबत माहिती दिली. यानंतर सर्वजण राजेश पाटील यांना तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट करत त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी मयताची पत्नी अस्मिता राजेश पाटील यांनी शनिवारी दुपारी २.२४ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. राजेश पाटील यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजणार आहे. चिपळूण पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.













