शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान उत्साहात
चिपळूण (प्रतिनिधी) : कृषी शिक्षणातून केवळ पारंपरिक शेतीपुरते मर्यादित न राहता संशोधन, कृषी उद्योजकता, अन्नप्रक्रिया, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार ज्ञान, कौशल्ये आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करून या संधींचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे माजी कृषी विस्तार संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षातील कृषी व अन्नतंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कृषी व संलग्न क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील व माजी कृषी संशोधन संचालक डॉ. व्ही. जी. मोरे होते. यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. सावंत यांनी कृषी पदवी प्राप्त केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या विविध करिअर पर्यायांची सविस्तर माहिती दिली. कृषी संशोधन, कृषी विस्तार, पीक उत्पादन तंत्रज्ञान, मृद व जलसंधारण, फलोत्पादन, पीक संरक्षण, बियाणे उत्पादन, कृषी निविष्ठा उद्योग, कृषी विपणन तसेच शासकीय व खासगी क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी केवळ पदवी संपादन करण्यावर भर न देता प्रत्यक्ष अनुभव, तांत्रिक कौशल्ये, संवादकौशल्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अन्नतंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अन्नप्रक्रिया, अन्नसुरक्षा, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग, साठवणूक आणि कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन या क्षेत्रांतही मोठ्या संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी नोकरीच्या संधींसोबतच स्वयंरोजगार आणि कृषिपूरक उद्योगांचाही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. रोपवाटिका, कृषी सेवा केंद्रे, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि कृषी आधारित स्टार्टअप्सच्या माध्यमातून तरुणांना उद्योजक बनण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील यांनी अशा व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांना करिअरची दिशा मिळते, असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास, प्रात्यक्षिके आणि कौशल्यविकासावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना कृषी व संलग्न क्षेत्रातील रोजगार, उच्च शिक्षण आणि उद्योजकतेच्या विविध संधींची माहिती मिळाली. विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.













