डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधासह लसीकरणाचा जि. प. सदस्या पूजा निकम यांनी घेतला आढावा

 सावर्डे गटातील आरोग्य उपकेंद्रांची केली पाहणी
 जंतुनाशक व धूर फवारणी प्रभावीपणे राबविण्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना

चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा तथा सावर्डे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा निकम यांनी सावर्डे जिल्हा परिषद गटातील आरोग्य उपकेंद्रांना भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र व खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या मांडकी आणि दहिवली येथील आरोग्य उपकेंद्रांची पाहणी केली. या भेटीदरम्यान आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक अभियानांचा तसेच शासकीय योजनांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
पावसाळ्यानंतर बदलत्या हवामानामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच गावांमध्ये जंतुनाशक फवारणी आणि धूर फवारणी नियमितपणे करण्यावर त्यांनी भर दिला. लहान बालके आणि गरोदर मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नियमित लसीकरण मोहिमेचीही त्यांनी माहिती घेतली. याशिवाय ३० वर्षांवरील पुरुष व महिलांसाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष आरोग्य तपासणी व निदान योजनेच्या कामकाजाची पाहणी केली. सार्वजनिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी गावांमध्ये स्वच्छता राखणे, आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत करणे आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी उपकेंद्र प्रभारी सीएचओ गणेश वाळे, आरोग्य सेवक देवानंद धारबा खिलारे, गौरव बनसोडे, आरोग्य सेविका शितल सुधाकर सावंत, उपकेंद्र मदतनीस अलका डोंगरे तसेच ग्रामस्थ महेश घाग आणि रुपेश घाग उपस्थित होते.