महायुतीत दोन-दोन भूमिपूजने योग्य नाहीत’; पक्षातील मतभेद चर्चेतून मिटवण्याचा सल्ला
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलण्याचा मला अधिकार नाही
चिपळूण (प्रतिनिधी) : लोटे औद्योगिक वसाहतीतील पाणीप्रश्न, आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई, महायुतीतील अंतर्गत मतभेद, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा आणि चिपळूणमधील विकासकामे अशा विविध विषयांवर पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. लोटे एमआयडीसीचा पाणीप्रश्न कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावणार असल्याची ग्वाही देतानाच, महायुतीमध्ये एकाच कामाची दोन-दोन भूमिपूजने होणे योग्य नसल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. तर शिवसेनेत एकनाथ शिंदे हेच निर्णय घेणारे नेते असल्याचे सांगत पक्षांतर्गत राजकीय चर्चांनाही त्यांनी उत्तर दिले.
लोटे एमआयडीसी परिसरात आगामी काळात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. निसर्गाच्या नियंत्रणात पाऊस पाडणे शासनाच्या हातात नसले, तरी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आपल्या हातात आहे. एमआयडीसीला किती पाणी उपलब्ध आहे, त्याची मर्यादा किती आहे, भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास उद्योगांना कोणत्या पद्धतीने पाणीपुरवठा करायचा, असे अनेक प्रश्न आहेत. यावर सर्व संबंधितांची बैठक घेऊन सामूहिक पद्धतीने मार्ग काढला जाईल. लोटे एमआयडीसीच्या पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सोडवू, असा ठाम विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या माध्यमातून एखाद्या विकासकामाचे दोन-दोन वेळा भूमिपूजन होणे योग्य नाही. राज्यमंत्री, आमदार किंवा खासदार यांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामांचे कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. मात्र, एकाच कामासाठी स्वतंत्रपणे दोन भूमिपूजने होणे ही महायुती सरकारच्या दृष्टीने योग्य बाब नाही. हे केवळ माझेच नव्हे, तर कार्यकर्त्यांचेही म्हणणे आहे. असे विषय एकत्र बसून चर्चेने संपवले पाहिजेत, अशी भूमिका सामंत यांनी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर बोलताना सामंत म्हणाले की, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी एकत्र यायचे की नाही, हा संबंधित दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा निर्णय आहे. त्यावर बोलण्याचा मला, एक शिवसैनिक म्हणून, अधिकार नाही. मात्र, जनतेच्या मनात जसा संभ्रम आहे, तसाच माझ्याही मनात संभ्रम आहे. चार महिन्यांपूर्वी एक भूमिका मांडली गेली आणि आता वेगळी भूमिका समोर येत आहे. त्यामुळे या संभ्रमाचा खुलासा संबंधित नेत्यांनीच केला पाहिजे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मी प्रामाणिकपणे उत्तर दिले. त्यात चुकीचे काय बोललो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवरही उदय सामंत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. पक्ष एकत्र आणण्याचे अधिकार उदय सामंत, ओमराजे निंबाळकर किंवा अन्य कोणत्याही नेत्यांना दिलेले नाहीत. हे अधिकार आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन सन्मानाने आणि दमदारपणे काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला दुसरीकडे जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना सामंत यांनी शरद पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मला पहिले तिकीट शरद पवार साहेबांनी अजितदादांच्या पाठिंब्यावर दिले. माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शंभर टक्के पवार साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली झाली, हे सांगायला मला कोणताही कमीपणा वाटत नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी उद्योगमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतरच उदय सामंत यांची महाराष्ट्राला खरी ओळख झाली, असेही ते म्हणाले.
चिपळूण नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाबाबत बोलताना त्यांनी ११ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मंजुरीची माहिती दिली. शासनाच्या नियमानुसार उपलब्ध निधीच्या १० टक्के रक्कम जमा असल्यास त्याच्या आधारे मोठ्या रकमेचे टेंडर काढता येते. या कामाचा एकूण खर्च माझ्या माहितीनुसार २० ते २५ कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. उर्वरित निधीही नगरविकास खात्याकडून उपलब्ध करून दिला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. कुंभार्ली घाटाच्या विकासासाठीही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच दऱ्यांमधील पर्यटन, पूल आणि वॉटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. सातारा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणाला जोडणाऱ्या तीन बोगद्यांची घोषणा केली असून, या प्रकल्पांचा उपयोग पर्यटन विकासासाठीही होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
चिपळूणमधील प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानांची अवस्था अत्यंत खराब असल्याचा मुद्दाही पत्रकारांनी उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्यांनाही या परिस्थितीची जाणीव आहे. शासकीय निवासस्थान सुस्थितीत नसल्यास भाड्याच्या घरात राहण्यासाठी शासनाकडून भाडे देण्याची तरतूद असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपांवर बोलताना सामंत यांनी हा निवडणुकीच्या प्रचारातील मुद्दा असल्याचे म्हटले. आपली मुस्कटदाबी केली जात असल्याचे चित्र निर्माण करून राजकीय नॅरेटिव्ह तयार करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ आदी उपस्थित होते.













