पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा प्रत्यक्ष सहभाग
चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील खेंड येथील शिवनदी परिसरात डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने वनराई बंधारा बांधण्यात आला. जलसंधारणाला चालना देऊन परिसरातील भूजलपातळी वाढविणे, पाण्याचा साठा निर्माण करणे आणि भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करणे, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या वनराई बंधारा बांधकामाच्या ठिकाणी चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश धोंडीराम सकपाळ यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष बंधारा बांधकाम कार्यात सहभाग घेतला. लोकप्रतिनिधींनी अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हावे, हा संदेशही त्यांच्या सहभागातून देण्यात आला.
यावेळी आरोग्य सभापती शुभम पिसे, शिवसेना गटनेते अंकुश आवले, नगरसेविका व मागासवर्गीय सभापती सौ. नीलम जाधव, सौ. वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे तसेच डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने श्रमदान करून वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलसाठ्यात वाढ करणे आणि परिसरातील पाणीटंचाईची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणासाठी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.













