सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कदम यांची शासनाकडे मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणच्या विकासाचा महत्त्वपूर्ण दुवा ठरणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे शासनाकडे केली आहे.
मिलिंद कदम यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्याला ऐतिहासिक आणि वैचारिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला असून, अनेक महापुरुषांच्या कार्याने या भूमीची ओळख देशपातळीवर निर्माण झाली आहे. त्यामुळेच रत्नागिरीला ‘भारतरत्नांची रत्नभूमी’ म्हणूनही गौरविले जाते. नवभारताच्या उभारणीत भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मौलिक योगदान दिले आहे. या महामानवाचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे असल्याने त्यांच्या कार्याचा आणि जन्मभूमीचा सन्मान म्हणून महामार्गाला त्यांचे नाव देणे उचित ठरेल, असे श्री. कदम यांनी नमूद केले आहे. मुंबई आणि गोवा या दोन महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या या महामार्गाला डॉ. आंबेडकर यांचे नाव मिळाल्यास कोकणच्या भूमीचा ऐतिहासिक गौरव वाढण्याबरोबरच त्यांच्या समतावादी विचारांचा आणि संविधानिक मूल्यांचा संदेशही व्यापक स्तरावर पोहोचेल. शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून नामकरणाचा निर्णय घ्यावा, असे आवाहन श्री. कदम यांनी केले आहे.













