शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन
चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबईचे शिल्पकार, भारतीय रेल्वेचे जनक आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीतील महत्त्वपूर्ण योगदान देणारे थोर समाजसुधारक जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांची जयंती व पुण्यतिथी शासनाच्या वतीने अधिकृतरीत्या साजरी करण्यात यावी, तसेच यासंदर्भात शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी पालकमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. सुवर्णकार संघ, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण, नारी सन्मान प्रतिष्ठान, दैवज्ञ समाज यांचे तर्फे निवेदन देण्यात आले.
नाना शंकरशेट यांनी मुंबईच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक विकासासाठी मोलाचे योगदान दिले. शिक्षणाचा प्रसार, स्त्रीशिक्षणाला प्रोत्साहन, सार्वजनिक संस्था उभारणी तसेच रेल्वेच्या विकासात त्यांनी घेतलेला पुढाकार हा भारतीय इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. अशा महान द्रष्ट्या व्यक्तिमत्त्वाची जयंती आणि पुण्यतिथी केवळ काही संस्था किंवा संघटनांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या माध्यमातून साजरी व्हावी. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा या मागणीमागील मुख्य उद्देश आहे. इतिहास घडविणाऱ्या महापुरुषांचे योगदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. नाना शंकरशेट यांना शासनस्तरावर योग्य सन्मान मिळावा आणि त्यांच्या कार्याची अधिकृत दखल घेतली जावी, यासाठी संबंधित मागणीचा सकारात्मक विचार करून शासन निर्णय निर्गमित करावा,अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.
नाना शंकर शेट यांचे कार्य महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या कार्याची फारशी दखल घेतली गेली नाही. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल. पालकमंत्री उदय सामंत यांचेकडे निवेदन सादर करताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक विक्रांत लवेकर, सौ.प्रियांका कारेकर, प्रभाकर कारेकर, सौ.विशाखा उतेकर, सौ.पुर्वा तांदळे, सौ.तृप्ती कदम, सौ. सुकन्या चव्हाण, सौ.पल्लवी पालकर, सौ. अर्चना कारेकर, सौ.प्रतिक्षा हळवंडे आदी महिला उपस्थित होत्या.













