होडावडेत मोफत इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा थाटात शुभारंभ

ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषणाचे धडे मिळणार

सावंतवाडी । प्रतिनिधी :
होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईचा स्तुत्य उपक्रम; पहिली ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी भाषेचे मार्गदर्शन

होडावडे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची आवड निर्माण व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना अस्खलित इंग्रजी बोलता यावे, या उद्देशाने होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.

होडावडे गावातील पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शक म्हणून सुनील कांबळी सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक प्रसाद आडेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी इंग्रजी भाषा ही आजच्या काळाची गरज असून शिक्षण, नोकरी, व्यवसाय तसेच दैनंदिन जीवनात इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढत असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषणाचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी असा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

इंग्रजी विषयाचे मार्गदर्शक सुनील कांबळी यांनी इंग्रजी भाषेतून विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषेची भीती न बाळगता आत्मविश्वासाने बोलण्याचा सराव करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषणाचे विविध पैलू शिकविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका अर्चना मक्राणे, शिक्षिका तन्वी बांदीवडेकर, होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईचे माजी सचिव विठ्ठल मेस्त्री, दिपेश परब आदी मान्यवर उपस्थित होते.

होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईचे स्थानिक प्रतिनिधी रामचंद्र कुडाळकर, उमेश पावणोजी, हनुमंत सरवणकर, समीर सावंत, तात्या मेस्त्री, बाबू सातार्डेकर, दीपक दळवी, हेमंत बावकर आदी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पावणोजी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समीर सावंत यांनी मानले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि संभाषण कौशल्य मोफत उपलब्ध करून देण्याचा होडावडे ग्रामोन्नती मंडळ मुंबईचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, या उपक्रमामुळे होडावडे गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.