रत्नागिरी : एखादा अपघात माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. हसतं-खेळतं कुटुंब, संसाराची स्वप्नं आणि भविष्याची आखलेली वाटचाल एका क्षणात बदलून जाते. मात्र अशा कठीण प्रसंगातही जगण्याची जिद्द, कुटुंबाची साथ आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास पुन्हा स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करता येते. याचेच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे खेड तालुक्यातील पॅराप्लेजिक दिव्यांग सुनील दत्ताराम खेतले!
सुनील दत्ताराम खेतले (वय ५० वर्षे), राहणार केळणे, गुमलेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यांचे वडील दत्ताराम रामचंद्र खेतले हे सैन्यदलातून निवृत्त झाले होते. २०२२ मध्ये हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. आई सुलोचना गृहिणी आहेत. एक भाऊ आणि दोन बहिणी असून सर्व विवाहित आहेत. भाऊ मुंबई येथे वॉचमन म्हणून नोकरी करतो.
दहावीनंतर सुनील मुंबईत कपड्यांच्या दुकानात काम करत होते. २००८ मध्ये ते गावी परत आले आणि चिपळूण येथे हमाल पंचायतच्या कार्यालयात काम करू लागले. २००३ मध्ये त्यांचा सोनल यांच्याशी विवाह झाला. सोनल या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. त्यांना चार मुली आहेत. मोठी मुलगी दिया इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे, दुसरी मुलगी भूमी बी.एस्सी. शिकत आहे, तर तिसरी मुलगी आराध्या नववीत आणि चौथी मुलगी ईशा सातवीत शिकत आहे.
सर्व काही सुरळीत सुरू असताना २०१४ साली नमनाचा कार्यक्रम करून परत येताना त्यांच्या गाडीला एका कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आणि कमरेपासून खालच्या भागातील संवेदना गेल्या.
अपघातानंतर त्यांना प्रथम कळंबणी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी डेरवण येथे पाठविण्यात आले. तपासणीनंतर पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवळपास एक महिना रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही संवेदना परत आल्या नाहीत. लघवी व शौचासंबंधीच्या संवेदनाही जाणवत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली.
एक महिन्यानंतर ते घरी परतले. मात्र दैनंदिन जीवनातील सर्व कामांसाठी त्यांना पत्नी सोनल यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत होते. अगदी वैयक्तिक स्वच्छतेपासून सर्व विधी बेडवरच करावे लागत होते. एका संस्थेकडून त्यांना व्हीलचेअर मिळाली होती; परंतु त्या व्हीलचेअरवर बसविण्यासाठी चार जणांची मदत घ्यावी लागत असे. त्यामुळे व्हीलचेअर असूनही त्यांना स्वतंत्रपणे हालचाल करणे शक्य होत नव्हते.
याच काळात त्यांचे मित्र अक्षय आंबरे यांच्या माध्यमातून त्यांना आर एच पी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे सर यांची माहिती मिळाली. त्यानंतर नाकाडे सर यांनी स्वतः त्यांच्या घरी भेट देऊन सुनील यांच्या परिस्थितीची आणि अडचणींची सविस्तर माहिती घेतली. त्यांना पुनर्वसन आणि फिजिओथेरपीची आवश्यकता लक्षात घेऊन हाजीअली येथे फिजिओथेरपी व पुनर्वसनासाठी जाण्याचा सल्ला दिला.
नाकाडे सरांच्या मार्गदर्शनानुसार सुनील आणि त्यांच्या पत्नी सोनल यांनी जवळपास चार महिने हाजीअली येथे राहून प्रशिक्षण घेतले. या काळात व्हीलचेअरवरून बेडवर आणि बेडवरून पुन्हा व्हीलचेअरवर स्वतःच्या ताकदीने कसे जायचे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर सुनील स्वतःहून बेडवर जाणे-येणे शिकले. तसेच युरिनसाठी स्वतः सेल्फ-कॅथेटरायझेशन करण्याचेही प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडून आला आणि स्वतःची कामे स्वतः करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.
मात्र घरी परतल्यानंतर बाहेर जाण्यासाठी योग्य साधन नसल्याने त्यांना घरातच राहावे लागत होते. कामासाठी बाहेर पडणे शक्य नव्हते. पत्नी सोनल या अंगणवाडी सेविका असल्याने त्यांच्या पगारावरच सध्या संपूर्ण कुटुंबाचा संसार चालतो. चार मुलींचे शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना सोनल यांची मोठी धडपड सुरू आहे.
सुनील यांना पूर्वी मिळालेली व्हीलचेअर खूप खराब झाली होती. ती चालविणेही अशक्य झाले होते. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन हालचालींमध्ये पुन्हा अडचणी निर्माण झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन आर एच पी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी संस्थेच्या वतीने सुनील खेतले यांना नवीन व्हीलचेअर भेट दिली.
विशेष म्हणजे ही नवीन व्हीलचेअर सुनील यांच्या शरीराला योग्य प्रकारे सूट झाली असून ती चालविणे त्यांच्यासाठी अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या हालचालींना अधिक सुलभता आली आहे. नवीन व्हीलचेअर मिळाल्याने सुनील यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने सादिक नाकाडे सरांचे मनापासून आभार मानले.
या वेळी आर एच पी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, सुनील खेतले, त्यांच्या पत्नी सोनल, मुली आराध्या व ईशा तसेच शिवाजी कदम, नितीन घाडगे, शुभम ढेपसे उपस्थित होते.













