दिवाळीत घरोघरी देवीचा जागर! सरावदी समाजाने जपली जोगवा मागण्याची शेकडो वर्षांची परंपरा

देवीची आरती, ओटी भरण्याचा मान अन् ओवाळणी म्हणून भाताची भेट; श्रद्धा आणि लोकसंस्कृतीचा अनोखा वारसा आजही कायम

देवरूख (प्रतिनिधी):

दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि मांगल्याची पर्वणी! मात्र कोकणच्या ग्रामीण संस्कृतीत दिवाळीला काही परंपरांचे असेही अनोखे रूप पाहायला मिळते, जे आजच्या आधुनिक काळातही श्रद्धेने जपले जात आहे. याच परंपरेचा एक सुंदर आविष्कार म्हणजे सरावदी समाजाकडून दिवाळीत देवीला घेऊन घरोघरी जाऊन जोगवा मागण्याची प्रथा!

दिवाळीच्या या विशेष दिवशी सरावदी समाजातील बांधव देवीला घेऊन गावातील घरोघरी पोहोचतात. प्रत्येक घरात देवीची आरती केली जाते. घरातील महिला आणि कुटुंबीय मोठ्या भक्तिभावाने देवीची ओटी भरतात. देवीचे दर्शन घेतल्यानंतर कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. घराघरांत देवीचे स्वागत करताना भक्तीमय वातावरण निर्माण होते. या परंपरेतील विशेष आकर्षण म्हणजे देवीच्या ओवाळणीसाठी दिला जाणारा भात! दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थांकडून ओवाळणी म्हणून भात दिला जातो. कोकणातील शेतीसंस्कृतीशी नाते सांगणारी ही प्रथा केवळ देवाणघेवाणीपुरती मर्यादित नसून त्यामागे श्रद्धा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीची भावना दडलेली आहे.

विशेष म्हणजे, या परंपरेतून गावातील प्रत्येक घराचा देवीशी असलेला भक्तिभावाचा संबंध अधिक दृढ होतो. घराघरांत देवीचे आगमन, आरतीचा गजर, ओटी भरण्याचा मान आणि भाताच्या रूपाने दिली जाणारी ओवाळणी या सगळ्यांतून कोकणच्या मातीत रुजलेली लोकसंस्कृती अनुभवायला मिळते. आजच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक पारंपरिक प्रथा काळाच्या पडद्याआड जात असताना सरावदी समाजाने ही परंपरा श्रद्धेने सुरू ठेवली आहे. ही केवळ एका समाजाची धार्मिक प्रथा नसून गावाच्या सांस्कृतिक वैभवाची आणि पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या श्रद्धेची ओळख आहे. दिवाळीच्या रोषणाईत घराघरांत पोहोचणारी देवी, भक्तीने भरलेली ओटी आणि ओवाळणीचा भात… या परंपरेतून आजही कोकणच्या मातीतील संस्कृतीचा सुगंध दरवळत आहे!