पहिल्या टप्प्यात श्वानांच्या गळ्यात काठी बांधणार- नगराध्यक्ष उमेश सकपाळ
चिपळूण (वार्ताहर) : शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीने हैराण झालेल्या नागरिकांनी आज नगर परिषदेवर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. “माणसं महत्त्वाची की कुत्री?” असा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांनी तात्काळ बंदोबस्ताची मागणी केली. यावर, पहिल्या टप्प्यात भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात काठी बांधून उपाययोजना सुरू केली जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिले.
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून त्यांची दहशत ही वाढली आहे. यामुळे आबालवृद्ध यांच्यासह नागरिकांना रोजच त्रास होत असून त्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. रात्री अपरात्री भटक्या कुत्र्यांची दहशती नागरिकांना सहन करावी लागत आहे. त्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी नागरिकांनी न.प.वर धडक दिली. यावेळी झालेल्या चर्चेत नागरिकांनी शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागे धावतात. पादचाऱ्यांवर अचानक हल्ले करतात, लहान मुलांचा पाठलाग धरतात अशा तक्रारी केल्या. याला उघड्यावर मास, मच्छीची होणारी खुलेआम विक्री, चायनीज सेन्टर चालक टाकत असलेले टाकाऊ अवशेष, प्राणी मित्र कोठेही घालत असलेले खाणे अशी बरीच कारणे आहेत. असे असतानाही यावरून नगर परिषदेला पत्रव्यवहार करूनही काहीही उपाययोजना करताना दिसत नाही. भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असताना त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व त्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम राबवली जात नसल्याचे आरोप नागरिकांनी केला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उर्फ बापू काणे, दादा खातू, राजू जाधव, अमित शेवडे, शमिना परकार, कैसर देसाई, नंदा भालेकर, विशाल राऊत, तृप्ती कदम, आरती वाटेकर, दीपाली मुळे, स्वाती कांबळे, अर्चना कारेकर, माधुरी बनसोडे, फैरोजा मोडक, स्नेहल पालकर, तृती कदम, आरोग्य सभापती शुभम पिसे, पाणी पुरवठा सभापती निहार कोवळे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, शिक्षण सभापती सौ. हर्षाली पवार, नगरसेवक अंकुश आवळे आदी उपस्थित होते.











