जलजीवन मिशनच्या मंजूर योजनांची कामे रखडली
टंचाईग्रस्त वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची सरपंच किशोर कदम यांची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील टेरव गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर असलेल्या नळपाणी योजनांची कामे तातडीने सुरू करावीत, तसेच तोपर्यंत टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी टेरवचे सरपंच किशोर कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती चिपळूण येथील पाणीपुरवठा विभागासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
टेरव गावातील बौद्धवाडी, तांबडवाडी, दत्तवाडी हनुमान मंदिर परिसर, दत्तवाडी मराठीवाडी, वरची सुतारवाडी आणि खालची सुतारवाडी आदी भागांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. गावातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आ.शेखर निकम यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत दोन नळपाणी योजनांना मंजुरी मिळाली असून, दत्तवाडीच्या स्वतंत्र नळपाणी योजनेलाही मंजुरी मिळाली आहे. काही ठिकाणी पाईपलाईनचे काम सुरू झाले होते. तसेच पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक जागाही ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली आहे. मात्र, अद्याप या कामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. याशिवाय वेतकोंडवाडी येथील पाण्याच्या टाकीपासून स्वतंत्र पाणीपुरवठा लाईन टाकण्याची मागणीही करण्यात आली आहे. या मागणीला संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याची माहिती असून, या कामाचा जलजीवन मिशनमध्ये समावेश करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी सरपंचांनी केली आहे. या निवेदनाची प्रत पालकमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार शेखर निकम, पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले तसेच संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टेरव गावाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी, मंजूर कामे सुरू करण्याची निश्चित तारीख व पूर्णत्वाची कालमर्यादा लेखी कळवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महिलांना पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने टँकर सुरू करावेत आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा सरपंच किशोर कदम यांनी व्यक्त केली आहे.











