मेला तो शेवटचा होता: एक प्रखर आणि विदारक सामाजिक वास्तव

हौशी राज्य नाट्य स्पर्धा 2026

रत्नागिरी अनघा निकम मगदूम :
आजही समाज अनेक विघातक रूढी-परंपरांच्या अंधारात कसा अडकला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याची ताकद नवी पिढी कशी देऊ शकते, याचे अत्यंत प्रखर दर्शन घडवणारी नाट्यकृती म्हणजे ‘मेला तो शेवटचा होता’. जरी या नाटकाचे शीर्षक थोडे वेगळे वाटत असले, तरी त्यातून एक निखळ सकारात्मकतेचा आणि परिवर्तनाचा संदेश मिळतो. या अनिष्ट प्रथांना आव्हान देणारा आणि अंधारातून बाहेर पडून स्वतःला नव्या पिढीचा, नव्या ऊर्जेचा आणि नव्या विचारांचा सूर्य सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या एका युवकाचा स्पष्ट संदेश या नाटकात पाहायला मिळतो.
अतिशय उत्तम संदेश देणारी ही नाट्यकृती लेखक विजय खानविलकर यांनी लिहिली असून, त्याला तितकेच तगडे दिग्दर्शन दशरथ रांगणकरे यांनी दिले आहे. उत्तम नेपथ्य, आवश्यकतेनुसार योग्य आणि दमदार पार्श्वसंगीत, समर्पक प्रकाशयोजना, योग्य रंगभूषा-वेशभूषा आणि अतिशय गंभीर, तितकाच सहज डोक्यात बसेल व आजच्या वास्तवाचे भान देणारा हा विषय अत्यंत ताकदीने सादर करणारे या नाटकातील सर्वच कलावंतांनी ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरीतील प्राथमिक फेरीत अत्यंत दमदार आणि आत्मविश्वासाने भरलेले सलामीचे सादरीकरण केले. स्वामी पिता माऊली चॅरिटेबल ट्रस्ट, कोळंबे यांच्या वतीने ‘श्रीदेवी त्रिमूर्ती नाट्य मंडळ, कोळंबे’ यांच्याकडून ही प्रभावी नाट्यकृती सादर करण्यात आली.
कथानकाची पार्श्वभूमी पाहता, डोंगरकपाारीत वसलेल्या एका छोटյ्या गावावर सरपंच सुभानरावाचे एकछत्री वर्चस्व असते. स्वातंत्र्याचा सूर्य उगवून कितीही वर्षे झाली, तरी आजही या गावात रूढी-परंपरा आणि अनिष्ट प्रथांचेच साम्राज्य आहे. माणूसपण हरवलेल्या या गावात सरपंच सुभानराव जे म्हणेल तीच पूर्व दिशा, अशी स्थिती असते. याच रूढी-परंपरांचा आधार घेऊन तुळाप्पा, त्याची बायको गिरीजा, मुलगा इंदर आणि मुलगी अंशी यांना अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात. तुळाप्पाचे कुटुंब स्मशानातच राहते आणि मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे पिढ्यानपिढ्यांचे काम त्यांच्याकडे असते. त्यातील अत्यंत विघातक रीत म्हणजे मृतदेहावरील ‘पिंड खाण्याची प्रथा’, जी पिढ्यानपिढ्या त्यांच्या वाट्याला आलेली आहे. हीच प्रथा पुढे इंदरही चालवणार, अशी सर्वांचीच अटकळ असते.
अशातच, गावात आलेला ग्रामसेवक भिवाप्पा त्यांच्या आयुष्यात प्रवेश करतो. तो त्यांना साक्षरतेची, हक्कांची आणि खऱ्या जगण्याची जाणीव करून देतो. इंदर आणि अंशीला शिक्षणाची गोडी लावून, स्मशानात आयुष्य संपवण्यापेक्षा गावात सरकारी योजनेतून हक्काचे घर बांधण्याचे स्वप्न तो त्यांच्या डोळ्यात उभे करतो. पिंडदानाचे अन्न प्राशन करणे म्हणजे स्वतःच्याच आयुष्याशी खेळणे आहे, हे पटवून दिल्यावर दोन्ही मुलांना नव्या आयुष्याची स्वप्ने पडू लागतात. तुळाप्पाच्या मनातही चांगल्या आयुष्याची सुप्त इच्छा निर्माण होते. परंतु, या परिवर्तनामुळे सरपंचाच्या सत्ताकारणाला मोठा हादरा बसतो. “तुळाप्पाशिवाय अंत्यसंस्कार करणार कोण?” हा प्रश्न गावामध्ये चर्चेचा विषय बनतो आणि सरपंच संतापतो.
गावाच्या जत्रेत देवाची काठी तुळाप्पाच्या घरी येणार, असे सरकारी आदेश आणण्यात भिवाप्पा यशस्वी होतो. यावर चवताळलेला सुभानराव भिवाप्पाला धमकावतोच, पण तुळाप्पाच्या सरकारी घराचा अर्ज जाळून टाकत आपली दहशत आणि सत्तेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, सरपंचाच्या या धमक्यांना न घाबरता भिवाप्पा पुन्हा प्रशासनाकडून तुळाप्पासाठी नदीशेजारची जागा मिळवून देतो आणि अन्नधान्याची व्यवस्था करतो. इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. आजवर गप्प असलेले कुटुंब सरपंचाला आव्हान देऊ लागते. हे लक्षात आल्यावर सुभानराव क्रूर डाव खेळतो. तुळाप्पाला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने भिवाप्पा आणि इंदर त्याला रुग्णालयात नेतात; तोपर्यंत सरपंच अंशीला घरातून पळवून नेतो. रुग्णालयातून बरा झालेला तुळाप्पा घरी येतो, तेव्हा त्याला ही वस्तुस्थिती समजते. एकीकडे अंशी गायब असते, तर दुसरीकडे सरपंच भिवाप्पाचे तोडलेले हात आणून तुळाप्पा आणि त्याच्या कुटुंबासमोर टाकतो. हे पाहून तुळाप्पाचे कुटुंब हादरून जाते. चिडलेला इंदर बहिणीला शोधायला बाहेर पडतो, तर तिकडे तुळाप्पाची प्रकृतीही अधिक बिघडते.
एकीकडे मुलगा, नवरा आणि मुलीची वाट बघत असलेली गिरीजा हतबल असते, तितक्यात इंदर घरी परततो. त्याला जबर मारहाण झालेली असते. थोड्याच वेळात तांदळाचे पोत येते आणि अंत्यसंस्कारासाठी मृतदेह येणार असल्याचा निरोप मिळतो. सरपंच घरात प्रवेश करतो; गिरीजा मुलीबद्दल विचारणा करते, तेव्हा सरपंच आंजीने (अंशीने) नदीत उडी मारल्याचे सांगतो. गिरीजा आणि इंदर हे ऐकून पूर्णपणे हादरलेले असतानाच, अंत्यसंस्कारासाठी खुद्द तुळाप्पाचाच मृतदेह समोर येतो आणि काही क्षण सर्वजण थिजून जातात. गिरीजा आणि इंदर यांचे सर्वस्व संपलेले असते.
हतबल झालेल्या इंदरला त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले जाते, पण इंदर त्याला ठाम विरोध करतो. अखेरीस, सरपंचाच्या दबावामुळे गिरीजालाच पतीच्या मृतदेहावरील पिंड प्राशन करण्यास भाग पाडले जाते. प्रथेनुसार शिवशंकराच्या पुतळ्याची पूजा करून गिरीजा तांडव नृत्य करते आणि पिंड प्राशन करण्यासाठी पुढे सरसावते. बरोबर त्याच क्षणी इंदर तिला रोखतो, सरपंचासह सर्वांना ठणकावून सांगतो की हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. सरपंचाच्या धमक्यांना न जुमानता इंदर सर्व अनिष्ट प्रथांना स्पष्ट नकार देतो आणि हे गाव, घर आणि प्रथा कायमची सोडण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतो. तो आईला सोबत घेऊन तुळाप्पाचा मृतदेह दुसऱ्या ठिकाणी नेऊन अंत्यसंस्कार करणार असे सांगून, मान ताठ करून बाहेर पडतो.
ठीक त्याच वेळी, तुळाप्पाच्या पिंडाचे सेवन करण्यासाठी एक कावळा तिथे येतो. भिवाप्पाने सांगितल्याप्रमाणे, पिंडाला कावळा शिवला म्हणजे मृतात्म्यास सद्गती मिळाली, या श्रद्धेवर नाटकाचा अत्यंत कलात्मकतेने शेवट होतो.
तांत्रिक बाजू आणि नेपथ्य
शेवटपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी संहिता आणि त्यावर केलेले अतिशय उत्तम दिग्दर्शन या नाटकाची जमेची बाजू ठरली. विशेषतः भिवाप्पाचे तोडलेले हात प्रत्यक्षात भासवणे, शेवटच्या दृश्यात तुळाप्पाचा मृतदेह व त्याच्या चेहऱ्याचा आभास निर्माण करणे, स्मशानभूमीतील शिवशंकराची मूर्ती, महाकाय वडाचे झाड आणि तुळाप्पाची पडकी झोपडी, तसेच शेवटी रंगमंचावर येणारा कावळा या सर्वांनी मिळून संपूर्ण नाटकात एक भयप्रद, अस्सल आणि जिवंत वातावरण निर्माण केले होते. सर्वच कलावंतांची वेशभूषा आणि प्रत्येक प्रसंगाला साजेसे असे कोल्ह्या-कुत्र्यांचे व कोंबड्यांचे आवाज असलेले दमदार पार्श्वसंगीत यामुळे हे नाटक खऱ्या अर्थाने एक सरस कलाकृती ठरले आहे.
अभिनय आणि दिग्दर्शकीय यश
या नाटकात सर्वात लक्षवेधी ठरली ती सरपंच सुभानरावाची भूमिका. भिवाप्पाने आणलेला घराचा जमिनीचा कागद रंगमंचावरच जाळून टाकत आपला दरारा दाखवणारा सुभानराव, अंशीला पळवून नेणारा आणि ग्रामसेवकाचे हात तोडून फेकून देणारा सुभानराव साकारणे आव्हानात्मक होते, जे उत्तम प्रकारे वठवण्यात आले. नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे अंशी आणि इंदर यांच्याही भूमिका तितक्याच प्रभावी ठरल्या. हतबल असलेला तुळाप्पा, त्याला खंबीर साथ देणारी गिरीजा आणि नवऱ्याच्याच मृतदेहावर पिंड भक्षण करण्याची वेळ आल्यावर तुटून पडलेली गिरीजा प्रेक्षकांचे मन हेलावून सोडते. इंदरचा आक्रमकपणा आणि संघर्ष अप्रतिम होता.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, गावकऱ्यांच्या भूमिका अगदी छोट्या असल्या, तरी प्रत्येकाने दिलेला एक शब्द किंवा वाक्य इतक्या ताकदीने साकारले की, प्रत्येक कलावंताच्या अभिनयातून मोठी जबाबदारी पार पाडल्याची जाणीव होत होती. एकही चूक होऊ नये, यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत या प्रयोगातून दिसत होती. कावळ्याने पिंड शिवण्याच्या दृश्याने नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, ‘मेला तो शेवटचा होता’ या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर एक अत्यंत प्रखर आणि दर्जेदार आव्हान उभे केले आहे. प्राथमिक फेरीतील पुढील नाटकांसमोर या कलाकृतीने एक उंच मानदंड प्रस्थापित केला आहे, यात शंका नाही.