कुडाळच्या स्टेट बँकेत चाकूचा धाक दाखवून घातला दरोडा

लाखो रुपयांची रोकड चोरणारा संशयित तरुण नागरिकांच्या सतर्कतेमुळे ताब्यात

कुडाळ : कुडाळ शहराच्या पानबाजार येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत आज दुपारी ३ च्या सुमारास चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. बँकेतील महिला कर्मचाऱ्याला चाकू दाखवून लाखो रुपयांची रोकड लुटत संशयित तरुण पळत जात असताना बँक कर्मचारी आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयित दरोडेखोर पळून जाण्यात अयशस्वी ठरला. दरम्यान, संतप्त नागरिकांनी संशयिताला पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणात आणखी एक संशयित सहभागी असण्याची शक्यता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक विकास बडवे, उपनिरीक्षक प्रमोद काळसेकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून कुडाळ पोलिसांकडून तपास सुरू आहे.