मुणगी-माईनवाडा व तेंडोलीतील अनधिकृत पाणी उपसा व विक्री तात्काळ बंद करा; स्थानिक लोकप्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिंधुदुर्ग :मुणगी-माईनवाडा आणि तेंडोली गावातील खासगी विहिरींमधून मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करून केळूस हद्दीतील आकाश फिश मिल कंपनीला पाणी विक्री केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हा अनधिकृत पाणी उपसा व विक्री तात्काळ बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे.

यासंदर्भात आज दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गावातील पाणीसाठ्याचा खासगी फायद्यासाठी वापर करून पाण्याची विक्री केली जात असल्याने भविष्यात ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अनधिकृत पाणी उपसा व विक्री बंद करावी आणि संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य आरती पाटील, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर आणि शाखाप्रमुख प्रसाद गावडे उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे.