आंबा मोहोर संरक्षणासाठी कृषी विभागाचे सुधारित फवारणी वेळापत्रक जाहीर; शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या शिफारसीनुसारच फवारणी करण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिकाचे तुडतुडे, भुरी आणि करपा यांसारख्या कीड व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘आंबा मोहोर संरक्षणाचे सुधारित वेळापत्रक’ यानुसारच कीटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
हवामानातील बदलानुसार आंब्याच्या मोहोरावर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागामार्फत फवारणीचे टप्पे आणि प्रमाण जाहीर करण्यात आले आहे.
आंबा मोहोर संरक्षणाचे सुधारित फवारणी वेळापत्रक (१० लिटर पाण्यासाठी प्रमाण)
पहिली फवारणी (पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी):
पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षणासाठी डेल्टामेथ्रीन २.८% प्रवाही (९ मि.ली.) किंवा टोलफेनपायराड १५% ईसी (२० मि.ली.) फवारावे.
दुसरी फवारणी (बोंगे फुटताना):
लॅम्बडा सायहेलोथ्रीन ५% (६ मि.ली.) किंवा पायमेट्रोझीन ५०% डब्लू.जी. (३.० ग्रॅम) वापरावे. तसेच, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने ५% हेक्झाकोनॅझोल (५ मि.ली.) किंवा पाण्यात विरघळणारे ८०% गंधक (२० ग्रॅम) मिसळावे. ढगाळ व पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगासाठी कार्बेन्डॅझीम १२% + मॅन्कोझेब ६३% (१० ग्रॅम) वापरावे.
तिसरी फवारणी (दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी):
इमिडाक्लोप्रिड १७.८% प्रवाही (३ मि.ली.) किंवा ब्युप्रोफेझिन २५% प्रवाही (२० मि.ली.) किंवा ट्रायफ्लुमेझोपायरीम १०% एस.सी. (२.५ मि.ली.) फवारावे. सोबत दुसऱ्या फवारणीत सांगितल्याप्रमाणे भुरी व करपा रोग नियंत्रणासाठी बुरशीनाशके मिसळावीत.
चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी):
थायोमेथॉक्झाम २५% WDG (१.० ग्रॅम) किंवा फ्लोनिकामिड ५०% डब्लू.जी. (४.० ग्रॅम) यासोबत भुरी व करपा नियंत्रणाची बुरशीनाशके वापरावीत.
पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी):
डायमेथोएट ३०% प्रवाही (१० मि.ली.) किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% (६ मि.ली.) यासोबत भुरी व करपा नियंत्रणाची बुरशीनाशके फवारावीत.
सहावी फवारणी (गरज असल्यास पाचव्या फवारणीनंतर १५ दिवसांनी):
तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासच, पाचव्या फवारणीत सुचविलेल्या कीटकनाशकांपैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना व दक्षता
अनावश्यक किंवा शिफारस नसलेल्या औषधांचा वापर टाळून विद्यापीठाच्या अचूक प्रमाणानुसार व बाटलीवरील लेबल क्लेमनुसारच फवारणी करावी.
कीटकनाशके केवळ कृषी विभागाचा वैध परवाना असलेल्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत.
खरेदी करताना औषधाचे नाव, बॅच क्रमांक, अंतिम मुदत आणि किमतीचा उल्लेख असलेली पक्की पावती (बिल) न चुकता घ्यावी.
फवारणीनंतर औषधांच्या रिकाम्या बॉटल्स, डबे, पॅकिंग आणि खरेदीच्या पावत्या जपून ठेवाव्यात, जेणेकरून गुणवत्ता तपासणी किंवा तक्रारीच्या वेळी पुरावा उपलब्ध राहील.
अनधिकृत विक्रीबाबत तक्रारीसाठी संपर्क
जिल्ह्यात कोठेही विनापरवाना, अनधिकृत किंवा बनावट कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ खालील गुण नियंत्रण निरीक्षकांशी संपर्क साधावा:
जिल्हास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक:
अभिजीत गडदे: ९४२२६२५६००
रोहन चोथे: ९१८५२०८००८
तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक:
रत्नागिरी: राजेंद्र कुंभार (९४२३०४७४६६)
राजापूर: विद्या तिष्टक (९१८५२०८०६४)
लांजा: सुभाष गुरव (९४२२६७९५४६)
चिपळूण: भीमाशंकर कोळी (९४२१५९९८००)
गुहागर: कपिल चिंगळे (९१८५२०८१४०)
संगमेश्वर: चंद्रकांत कोळी (९४०३७७२८०४)
दापोली: वर्षा गोरीवले (९१८५२०८१५७)
खेड: जगदीश शिंदे (९१८५२०८१८८)
मंडणगड: घनश्याम अभंग (८२७५४६५९४५)