रत्नागिरी जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरूच; तरुणांसह तिघांनी गळफास लावून संपवले जीवन

crime

रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये तरुणासह तिघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागर तालुक्यात या घटना घडल्या असून, तरुण वयोगटातील मुलांचे टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे.
चिपळूण तालुक्यातील कळवंडे (माडवाडी) येथे प्रशांत प्रदिप उदेग (वय २३, व्यवसाय गवंडी मजुरी) या तरुणाने राहत्या घराच्या टेरेसवर कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या पूर्वी ही घटना घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना संगमेश्वर तालुक्यातील चाफवली उगवतीवाडी येथे घडली. विलास दत्ताराम गावडे (वय ४५) हे बुधवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घरात गुरांना खायला घालायला जातो, असे सांगून बाहेर पडले होते. मात्र, त्यांनी घराशेजारील वाड्यालगत असलेल्या फणसाच्या झाडाच्या फांदीला काळ्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. त्यांना खाली उतरवून देवळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. देवरुख पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
तिसऱ्या घटनेत गुहागर तालुक्यातील अंजनवेल सडेवाडी येथील दत्ताराम महादेव गुरव (वय ४०) यांनी राहत्या घराच्या हॉलमधील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून जीवन संपवले. बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या पूर्वी हा प्रकार उघडकीस आला. गुहागर पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तिन्ही घटनांमधील आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. संबंधित पोलीस ठाण्यांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.