दोडामार्ग l प्रतिनिधी :वै. ह. भ. प. प. पू. सद्गुरू वासुदेव महाराज वझे यांच्या आश्रयाखाली चालत आलेल्या येथील श्री पांडुरंग मंदिरात कार्तिक एकादशीनिमित्त शुक्रवार, दि. २० ते रविवार, दि. २२ नोव्हेंबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवाची सुरुवात शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी रात्री दशमी ज्योती पूजनाने होणार असून त्यानंतर रात्री ८ वाजता हरिपाठ होईल. शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती व महापूजा पार पडेल. यानंतर सकाळी भजन, सायंकाळी ७ वाजता हरिपाठ आणि रात्री ग्रामस्थांची भजने होणार आहेत. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, महापूजा व भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी ११ वाजता दिंडी सोहळा व महाप्रसादाने या तीन दिवसीय उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन झोळंबे श्री पांडुरंग मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.












