सावंतवाडी । प्रतिनिधी :
“पुस्तक हेच गुरू, वाचन हेच जीवन” हा मूलमंत्र जपत गेल्या पंचवीस वर्षांपासून ज्ञान, संस्कार आणि वाचन संस्कृतीचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्या रौप्य महोत्सवी सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या गौरवशाली प्रवासाचा हा ऐतिहासिक सोहळा शनिवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता मळगाव येथील रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात संपन्न होणार आहे.
पंचवीस वर्षांची अखंड वाचनसेवा आणि संस्कारांची ही तपश्चर्या रौप्य महोत्सवाच्या रूपाने अधिकच तेजस्वी झाली आहे. या मंगलमय सोहळ्याचे उद्घाटन आणि दीपप्रज्वलन सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या स्वागताने होईल.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, तर प्रमुख वक्ते म्हणून सावंतवाडीच्या अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके आणि सिंधुदुर्गचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक दीनानाथ नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.
कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात सायंकाळी ४:१५ वाजता वाचन मंदिराच्या पंचवीस वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा लेखाजोखा मांडला जाईल, तर ४:४५ वाजता उपस्थित मान्यवरांची शुभेच्छापर व प्रेरणादायी भाषणे होतील. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भक्तीरसात न्हाऊन निघणाऱ्या ‘भजन संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सुप्रसिद्ध युवा बुवा श्री. ओंकार कुंभार व श्री. पुरुषोत्तम परब आपली कला सादर करणार आहेत. त्यांना तबला साथ श्री. सिद्धेश वेंगुर्लेकर आणि पखवाज साथ श्री. विशाल कांदूरकर यांची लाभणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक श्री. राजाजी सामंत (नेरूर) हे करणार आहेत.
”वाचाल तरच वाचाल” हा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक व संस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रसिक वाचक व ग्रामस्थांनी सहकुटुंब, सहपरिवार आवर्जून उपस्थित राहावे, असे सस्नेह निमंत्रण व विनम्र आवाहन वाचन मंदिराचे अध्यक्ष श्री. महेश रमाकांत खानोलकर, कार्यवाह सौ. स्नेहा महेश खानोलकर तसेच समस्त संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद यांनी केले आहे.













