लांजा येथील पत्रकार रवींद्र साळवी यांना स्व. रमेश डोळस जिल्हास्तरीय आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कार जाहीर

लांजा ( प्रतिनिधी) : गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ लांजा तालुक्याच्या पत्रकार क्षेत्रात कार्यरत असलेले दैनिक सकाळ चे लांजा प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार
रवींद्र साळवी यांना वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ वेरवली च्या वतीने देण्यात येणारा स्व. रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
वेरवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या स्व. रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कार हा लांजा येथील रवींद्र साळवी यांना जाहीर झाला आहे.
लांजा तालुक्यातील वेरळ गावचे सुपुत्र असलेले रवींद्र साळवी हे गेली वीस वर्षाहून अधिक काळ पत्रकार क्षेत्रात आहेत. दैनिक सकाळचे लांजा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे.‌ रवींद्र साळवी यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार, तंटामुक्तीचा कोकण विभागाचा पुरस्कार, ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कृषी क्षेत्रातील भात पीक स्पर्धेत दोन जिल्हास्तरीय पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहेत.
तालुक्यातील एक निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.‌‌ त्यांच्या या एकूणच कामगिरीची दखल घेत वेरवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने‌ त्यांची जिल्हास्तरीय आदर्श समाजाभिमुख पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.‌
दिनांक २७ डिसेंबर रोजी या सकाळी ९.०० वाजता श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक प्रशालेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमांमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्काराबद्दल रवींद्र साळवी यांच्यावर तालुक्यातील पत्रकार क्षेत्रासह सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.