माजी सरपंच राजन राऊळ यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी
सावंतवाडी : सावंतवाडी–आंबोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ एच वर माडखोल धवडकी येथे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने रंबलर बसविण्यात यावेत, अशी आग्रही मागणी माडखोलचे माजी सरपंच राजन विष्णू राऊळ यांनी केली आहे. सावंतवाडी दौऱ्यावर आलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले.
माडखोल धवडकी येथे १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी सलग दोन दिवस अपघात घडले आहेत. या दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या ठिकाणचा धोकादायक वळण आणि वेगवान वाहतूक पाहता भविष्यात मोठ्या अपघातांची शक्यता बळावली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनचालकांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
सावंतवाडी–आंबोली या महामार्गावरून आंबोली पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या पर्यटकांसह कोल्हापूर आणि बेळगावच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांची दिवसेंदिवस मोठी वर्दळ वाढत आहे. या वर्दळीच्या तुलनेत माडखोल धवडकी परिसरात वेग नियंत्रक यंत्रणा नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे राजन राऊळ यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
विशेष म्हणजे, या समस्येबाबत माडखोल ग्रामस्थांनी यापूर्वी सप्टेंबर महिन्यातच राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडी कार्यालयात लेखी निवेदन देऊन रंबलर बसविण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्यापही या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पालकमंत्री नितेश राणे यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे आणि संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाला माडखोल धवडकी येथे त्वरित रंबलर बसविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी माजी सरपंच राजन विष्णू राऊळ यांनी केली आहे.













