राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या सभासदांना १२ टक्के लाभांश जाहिर
राजापूर शहरात स्वमालकीची सुसज्य वास्तु उभारण्याचा संकल्प
३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
राजापूर (वार्ताहर): एकतीस वर्षांची यशस्वी वाटचाल करताना आगामी काळात नवी झेप घेण्याचे दृष्टीने पतसंस्थेचे रत्नागिरी जिल्हा असलेले कार्यक्षेत्र वाढवून ते कोकण विभागात वाढविण्याचा महत्वपुर्ण ठराव रविवारी पार पडलेल्या राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

याबाबत आवश्यक त्या गोष्टींची शासन स्तरावर पुर्तता करून चालु आर्थिक वर्षात मंजुरी घेवून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचे दृष्टीने प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. तर सहकार खात्याकडून आलेल्या नव्या धोरणासह उपविधी दुरूस्तीला सभेत मंजुरी देण्यात आली.
तसेच या बैठकीत पतपेढीला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात १ कोटी ५८ लाख २७ हजार इतका निव्वळ नफा झाला असून या नफ्यातुन संचालक मंडळाने सभासदांना शिफारस केलेल्या १२ टक्के लाभांश वाटपाला मंजूरी देण्यात आली.
तर पतसंस्थेने भारतीय रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याच्या सूचना व मार्गदर्शक तत्वांचे पालन करत उत्पन्न आणि खर्च यांचा सुयोग्य ताळमेळ साधत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ठेवी, कर्जवितरण, वसुली, नफा, एकुण व्यवसाय अशा सर्वच आघाडीवर साधलेल्या चौफेर प्रगतीबद्दल व विविध पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल समाधान व्यक्त करत संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांचे अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला.
तसेच आगामी काळात व संस्थेच्या प्रगतीची घोडदौड कायम राखताना राजापूर शहरात संस्थेला लौकीकाला साजेशी सर्व सोयी सुविधांनी सज्ज अशी नवी वास्तु उभी करण्याचा संकल्प नव्याने या बैठकीत सोडण्यात आला. तर नवीन शाखा निर्मितींबरोबरच १०० कोटी ठेवींचे उद्दीष्ट राखताना एकूण व्यवसाय १५० कोटीवर नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सर्वच सभासदांनी संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करत विधायक अशा सुचनाही मांडल्या.
राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीची ३१ वी वार्षिक सभा रविवारी राजापूर हायस्कुलच्या कलामंदिर सभागृहात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष प्रकाश लोळगे यांसह सर्व संचालक, वसुली अधिकारी श्रीकांत राघव उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी पतपेढीच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. पतसंस्थेने या आर्थिक वर्षात यशस्वी भरारी घेत चांगली प्रगती साधल्याचे नमुद केले. संस्थेची एकूण सभासद संख्या १४ हजार ४३८ इतकी असून यामध्ये १३ टक्के वाढ झाल्याचे सांगितले. संस्थेच्या एकत्रित व्यवसाय वाढ होऊन तो १३२ कोटी २२ लाख इतका झाला आहे. तर संस्थेने ७७.९६ कोटींच्या ठेवी जमा करताना संस्थेने ५४ कोटी २५ लाखाचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेचे खेळते भागभांडवल १०५ कोटी ५५ लाख इतके असून एकूण गुंतवणूक ४६ कोटी ८० लाख इतकी झाली आहे. ९८.५० टक्के कर्ज वसुली करताना 0 टक्के एनपीए आणि सीआरएआरचे प्रमाण १५ टक्के राखत ‘अ’ऑडीट वर्ग प्राप्त केला आहे. पतसंस्थेच्या ३१ वर्षाच्या वाटचालीत २६ वेळा ‘अ’ वर्ग राखण्यात यश मिळविल्याचे श्री. मांडवकर यांनी सांगितले. नवीन शाखांसह सर्वच शाखांनी या आर्थिक वर्षात चौफेर प्रगती साधल्याचे नमुद केले.
यावेळी सभासद रविंद्र नागरेकर, शंकर चोरगे, संदीप पुजारी, रामचंद्र सरवणकर यांनी चर्चेत सहभाग घेताना संस्थेने केलेल्या कामकाजाचे कौतुक केले. संस्थेच्या प्रगतीत संस्थेचा कर्मचारी हा प्रमुख घटक असून या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्यात यावी अशी मागणी यावेळी या सभासदांनी केली. यावर अध्यक्ष मांडवकर यांनी कर्मचाऱ्यांप्रती संस्थेला नक्कीच सहानुभुती आहे. या मागणीचा सहानुभुतीपुर्वक विचार करून कर्मचाऱ्यांना व पिग्मी एजंट यांना योग्य न्याय दिला जाईल अशी ग्वाही दिली. तर गाव तिथे शाखा सुरू करणे शक्य नसल्याने काही महत्वाच्या ठिकाणी मध्यवर्ती भागात पतसंस्थेच्या सेवा उपलब्ध होण्याचे दृष्टीने अत्याधुनिक ग्राहक सेवा केंद्र (काऊंटर) सुरू करण्यात येणार असल्याचे मांडवकर यांनी सांगितले.
प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते मंजुर करण्यात आले. तर विषयपत्रीकेवरील विषयानुरूप चर्चा होवून ठराव करण्यात आले. तर वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद, वैधानिक लेखापरीक्षण अहवाल याला मंजूरी देण्यात आली. तर नफा विभागणीस मान्यता देत वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच सन २०२५-२६ या आर्थिक सालाकरिता वैधानिक लेखापाल म्हणून नचिकेत जोशी आणि कं. ची नेमणूक करण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मांडवकर यांनी संस्थेच्या हिताच्या सुचनांचा कायमच आदर केला जाईल. सभासदांच्या हिताचे आणि पतसंस्थेच्या हिताचे जे जे काही करता येईल ते ते करण्यास संचालक मंडळ कटिबध्द असून त्यासाठी संस्थेचे दरवाजे कायम सभासदांसाठी खुले राहतील अशी ग्वाही दिली. ज्या हेतूने ही संस्था ज्या समाजधुरीणांनी सुरू केली त्याला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेवूनच कामकाज केले जाईल त्यासाठीच्या विधायक सूचनांचे स्वागतच केले जाईल असे मांडवकर यांनी सांगितले. पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीत संचालक मंडळ, कर्मचारी वृंद यांच्या बरोबरच सभासद, कर्जदार, ठेवीदार, हितचिंतक यांचा मोलाचा वाटा राहिल्यानेच पतसंस्थेने ही भरारी घेतल्याची भावना व्यक्त केली. सभासदांच्या सूचनांचे कायमच स्वागत असेल व संस्थेच्या प्रगतीसाठी काम केले जाईल अशी ग्वाही दिली. तर संस्थेच्या प्रगतीबाबत चांगली चर्चा करून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडल्याबद्दल सभासदांना धन्यवाद दिले.
या सभेला सभासद उपस्थित होते. आभार सीईओ जितेंद्र पाटकर यांनी मानले.












