यवतमाळचे धम्मा कांबळे प्रमुख वक्ते
१४ शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून रॅलीचे आयोजन
चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान सन्मान समिती, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी चिपळुणात संविधान सन्मान रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात यवतमाळ येथील संविधान अभ्यासक धम्मा कांबळे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. संविधानाचे महत्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, भारतीय लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचा जागर करण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात १४ शैक्षणिक संस्थांचा सहभाग राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. या रॅलीला सकाळी ८ वाजता मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूल, खेर्डी येथून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट हायस्कूल, आर. सी. काळे कनिष्ठ महाविद्यालय पेढे, गोवळकोट कमानी, रीगल कॉलेज कोंढे, दलवाई हायस्कूल मिरजोळी, नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, अली पब्लिक स्कूल, आनंदाराव पवार महाविद्यालय खेड, मोतीवाले पुरंजपे हायस्कूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, युनायटेड इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल आणि बांदल हायस्कूल या मार्गाने रॅली पुढे जाणार आहे. सायंकाळी ५.४५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे रॅलीची सांगता होईल. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत प्रमुख वक्ते धम्मा कांबळे (यवतमाळ) हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिजन भारत राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समाजजीवनात रुजविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या संविधान सन्मान रॅलीत आणि जाहीर सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन संविधान सन्मान समिती, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.












