तरुण खेळाडूंना क्रीडा प्रतिभा दाखवण्याची सुवर्णसंधी
सावंतवाडी । प्रतिनिधी : वाढणारे शारीरिक आजार दूर करण्यासाठी आणि युवकांमध्ये खेळाडूवृत्ती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सावंतवाडी येथील सिंधू रनर्स आणि स्पोर्ट्स फाउंडेशन, सावंतवाडी पॅलेस बुटीक आर्ट हॉटेल व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधू यंग चॅम्पियन्स रन’च्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २७ डिसेंबर रोजी ऐतिहासिक सावंतवाडी राजवाडा येथे ही स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती सावंतवाडीचे युवराज तथा भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे आणि युवकांमधील लपलेली क्रीडा प्रतिभा शोधणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे लखमराजे भोसले यांनी सांगितले. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले असून यंदा साडेपाचशेहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी वयोगटानुसार चार स्वतंत्र धावण्याच्या श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये १६ ते १९ वयोगटासाठी १० किलोमीटरची शर्यत होणार असून स्पर्धकांनी सकाळी ५:३० वाजता उपस्थित राहायचे आहे, तर शर्यतीला सकाळी ६:०० वाजता सुरुवात होईल; यासाठी ८५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. १३ ते १६ वयोगटासाठी ५ किलोमीटरची शर्यत असून सकाळी ६:०० वाजता रिपोर्टिंग आणि ६:३० वाजता शर्यत सुरू होईल, यासाठी ७५० रुपये शुल्क आहे. १० ते १३ वयोगटासाठी ३ किलोमीटरच्या शर्यतीचे रिपोर्टिंग सकाळी ६:३० वाजता व सुरुवात ७:०० वाजता होणार असून प्रवेश शुल्क ६५० रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच ७ ते १० या लहान वयोगटासाठी १.५ किलोमीटरची शर्यत ठेवण्यात आली असून सकाळी ७:०० वाजता रिपोर्टिंग आणि ७:३० वाजता शर्यतीला सुरुवात होईल, यासाठी ५५० रुपये शुल्क आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व नोंदणीकृत स्पर्धकांना टी-शर्ट, पदक आणि पूर्णता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेदरम्यान पिण्याचे पाणी, तातडीची वैद्यकीय सुविधा आणि स्पर्धेनंतर सर्व स्पर्धकांसाठी अल्पोपहाराची उत्तम सोय आयोजकांकडून करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी www.Sindhurunners.com या संकेतस्थळावर किंवा जाहिरात पोस्टरवरील क्यूआर (QR) कोड स्कॅन करून ऑनलाइन नोंदणी अर्ज भरायचा आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील “Sindhu_Runners_07” या पेजला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणी करण्याची अंतिम तारीख ५ डिसेंबर २०२६ ही असून पालकांनी आपल्या पाल्यांची लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तरुण खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची आणि क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याची ही उत्तम संधी असल्याने सर्व तरुण धावपटूंनी या रोमांचक दिवशी सहभागी होऊन धावण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सिंधू रनर्स टीमने केले आहे. या पत्रकार परिषदेला सिंधू रनर्सचे डॉ. स्नेहल गोवेकर, सुप्रिया मोडक, जॉन्सन फर्नांडिस, शिवम घोगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.













