नगरपरिषदेच्या कारभारात माझा कोणताही हस्तक्षेप नाही
सावंतवाडी, प्रतिनिधी : मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून आमदार दीपक केसरकर त्यादृष्टीने पुढील कार्यवाही करत आहेत. या प्रकल्पावर पालकमंत्री नितेश राणे यांचेही लक्ष असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. संबंधित जागेची विभागणी झाली असून राजघराण्याकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी माहिती युवराज लखमराजे भोंसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच, नगरपरिषदेच्या कारभारात माझा कोणताही हस्तक्षेप नसून नगराध्यक्षा म्हणून युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले या सक्षम आहेत आणि त्या स्वतः निर्णय घेतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना युवराज लखमराजे भोंसले यांनी शहरातील प्रलंबित विकासकामे आणि राजकारणावर भाष्य केले. नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत होणाऱ्या आरोपांचे खंडन करताना ते म्हणाले की, मी कधीही नगरपरिषदेत जात नाही. काही बाबींमध्ये मी किंवा पक्ष सल्ला देतो, मात्र अंतिम निर्णय नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले याच घेतात. मोती तलाव आणि रामेश्वर प्लाझा येथील विषयांबाबतच आपला नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क येतो. राजवाड्यात येणारे एक-दोन ठेकेदार हे आमच्या वैयक्तिक कामांसाठी येतात, ते नगरपरिषदेच्या कामांसोबतच खाजगी कामेही घेतात. त्यामुळे त्यावरून कोणी गैरसमज पसरवत असेल तर ते चुकीचे आहे. सावंतवाडीच्या विकासासाठी एक नागरिक म्हणून आपण सल्ला देण्याचे काम करतो, असे त्यांनी नमूद केले.
मोती तलावाच्या सद्यस्थितीबाबत बोलताना श्री. भोंसले म्हणाले की, ही परिस्थिती गेल्या ५ ते १० वर्षांतील दुर्लक्षामुळे आणि काही इमारतींमध्ये सांडपाणी व्यवस्थापन नसल्यामुळे उद्भवली आहे. आता नगराध्यक्षा व नगरसेवकांनी यात लक्ष घालून स्वच्छतेस प्रारंभ केला असून प्रशासनाने संबंधित इमारतींना नोटिसाही बजावल्या आहेत. तसेच, विविध विकासकामांसाठी खोदलेल्या रस्त्यांचे काम कामगारांच्या कमतरतेमुळे काहीसे रखडले होते, पण आता कामाला वेग आला आहे. आजचा त्रास सहन केल्यास भविष्यात पाणी आणि गॅस थेट घरापर्यंत पोहोचणार आहे. रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी भाजप म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत.
शहरातील वाढत्या पर्यटकांमुळे आणि वाहनांच्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे सकारात्मकतेने पाहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
रस्ते रुंद करणे आता शक्य नसल्याने नगरपरिषद प्रशासनाने ‘वन-वे’चा निर्णय घेतला असून पोलीस प्रशासन त्यावर योग्य उपाययोजना करेल. दरम्यान, शहराची नळपाणी योजना पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कामाच्या दर्जाबाबत तांत्रिक माहिती देण्यासाठी पीएमसी नेमलेली आहे, परंतु ही योजना पूर्ण झाली नाही तर भविष्यात पाणीटंचाई निर्माण होईल. त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह नागरिकांनीही या कामावर लक्ष ठेवून ते पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन युवराज लखमराजे भोंसले यांनी केले.













