अंगणवाडीतील रेन वॉटर हार्वेस्टिंग अपूर्णच!

भजन मंडळांचे अनुदान परत,

शिक्षकांच्या कार्यमुक्तीवरून वादंग!

कामगार कल्याणच्या किट वाटपातील अनियमिततेवरही प्रश्न!

सिंधुनगरी प्रतिनिधी

अंगणवाडींच्या रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे अपूर्ण असतानाही पूर्णत्वाचे दाखले देऊन ठेकेदाराला बिले अदा करणे, ११२ भजन मंडळांचे अनुदान परत जाणे, सभागृहाला विश्वासात न घेता शिक्षकांना कार्यमुक्त करणे आणि कामगार कल्याण विभागाच्या किट वाटपातील अनियमितता अशा विविध मुद्द्यांवरून सोमवारी जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा चांगलीच गाजली. जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, संदेश सावंत, संदीप गावडे यांनी प्रशासनाच्या शंकास्पद कार्यपद्धतीवर लक्ष वेधले! जि. प. चे अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही या सर्वच विषयांची घेतली गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना दिली समज!

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. उपाध्यक्ष दादा साईल, सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील,सभा सचिव जयप्रकाश परब यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

समितीच्या सदस्यानी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक प्रश्नांवर जाब विचारला. अपूर्ण कामांची चौकशी, दोषींवर कारवाई आणि प्रलंबित लाभ तातडीने देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

जिल्ह्यातील ३९९ अंगणवाडी इमारतींसाठी प्रत्येकी ९४ हजार रुपये मंजूर असलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेची कामे अपूर्ण असतानाही पूर्णत्वाचे दाखले घेऊन पैसे अदा केल्याचा मुद्दा मनोज रावराणे यांनी उपस्थित केला. यावर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. अर्धवट कामे पूर्ण करण्याचे आश्वासन महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर यांनी दिले.

भजनी मंडळांसाठी मंजूर झालेल्या १५० पैकी ११२ मंडळांना अद्याप अनुदान न मिळाल्याने संदेश सावंत यांनी प्रशासनाला धारेवर धरले. हा निधी परत गेल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. यावर अध्यक्ष प्रमोद कामत यांनी चौकशीचे आदेश दिले, तर वित्त सभापती संतोष साटविलकर यांनी जिल्हा परिषद स्वनिधीतून ११२ मंडळांना प्रत्येकी १२ हजार रुपये देण्याची तरतूद करण्याचे आश्वासन दिले.

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आणि राजीनाम्याच्या मुद्द्यावरूनही वादळी चर्चा झाली. सभागृहाला विश्वासात न घेता आठ शिक्षकांना कार्यमुक्त केल्याबद्दल अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे एकाही शिक्षकाला कार्यमुक्त करू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या २८ कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबतही त्यांनी हीच भूमिका घेतली. सभागृहाला डावलून निर्णय घेतल्यास आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा सदस्यांनी दिला.

कामगार कल्याण विभागाच्या किट वाटपातील अनियमितता तसेच बांधकाम कामगारांच्या मुलींना विवाहानंतर मिळणारे अनुदान पाच वर्षांनंतरही प्रलंबित असल्याचे मुद्दे उपस्थित झाले. याबाबत माहिती संकलित करून अहवाल सादर करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. तब्बल ५५ विषयांसह आयत्यावेळच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चेत रस्ते, शाळा, ग्रामपंचायतींच्या सायकली आणि अन्य स्थानिक प्रश्नांवरही सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे ही सभा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरील प्रश्नांनी गाजली.