महिला काथ्या क्लस्टरच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा पुढाकार

सावंतवाडी :
​महिला काथ्या क्वायर क्लस्टरच्या कामातील विविध अडचणी आणि प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी क्लस्टरच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. क्लस्टरचे अध्यक्ष एम. के. गावडे आणि संचालक प्रज्ञा परब यांनी या भेटीदरम्यान प्रकल्पाचे सविस्तर प्रश्न मांडून त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळावे, अशी आग्रही मागणी केली.

​या चर्चेदरम्यान क्लस्टरला आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलाचा गंभीर प्रश्न उद्योगमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. प्रकल्पात अद्याप एकही युनिट वीज वापरलेली नसतानाही सुमारे २२ लाख रुपयांचे वीज बिल आकारण्यात आले असून, ते तातडीने माफ करण्यात यावे, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. यासोबतच, कोविड काळामुळे प्रकल्पाच्या कामास विलंब होऊन अंदाजित खर्चात मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीला ७ कोटी ५८ लाख रुपये असलेला या प्रकल्पाचा खर्च प्रत्यक्षात ११ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असल्याने, प्रकल्पाच्या खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

​प्रकल्पाचे प्रत्यक्ष उत्पादन लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आणि यंत्रसामग्रीचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी किमान दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता असल्याचे पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, कोकणातील स्थानिक शेतकरी आणि महिलांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी शासनाच्या भांडार खरेदीमध्ये २०१६ पर्यंत संस्थेला असलेले आरक्षण पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणीही करण्यात आली. या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महिला काथ्या क्लस्टरच्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाने सकारात्मक सहकार्य करावे, अशी विनंती अध्यक्ष एम. के. गावडे, संचालक प्रज्ञा परब आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.