वालोपे खून प्रकरणाचा जलद उलगडा

चिपळूण पोलिसांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि क्रेडाईतर्फे सत्कार

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरालगतच्या वालोपे परिसरात घडलेल्या नवनाथ कांबळे खून प्रकरणाचा जलदगतीने तपास करून संशयित आरोपी पवन जयंत आंबेडे याला अटक करण्यात चिपळूण पोलिसांना यश आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, तपास पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि क्रेडाई चिपळूण यांच्या वतीने मंगळवारी सत्कार करण्यात आला.
वालोपे येथील नवनाथ कांबळे खून प्रकरणाचा पोलिसांनी तत्परतेने तपास करून संशयित आरोपीला अटक केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मदत होत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या सत्कारप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहर उपाध्यक्ष सलीम पालोजी, क्रेडाई चिपळूणचे अध्यक्ष शकील चौगुले, सचिव प्रसाद खातू, माजी अध्यक्ष जावेद दलवाई आणि संतोष तडसरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.