चिपळूण (प्रतिनिधी) : लो.टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तुसंग्रहालयात कै. रामभाऊ साठे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. या तैलचित्राचे अनावरण लोटिस्माच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे, नगरपरिषदेचे प्रशासक विशाल भोसले व ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद साठे सन्माननीय म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण झाल्यानंतर आकाश लिगाडे यांनी मनोगत व्यक्त करताना चिपळूणला मोठी साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली असल्याचे सांगितले. लोटिस्माचे कलादालन कोकणातील मान्यवर आणि विविध क्षेत्रात देदीप्यमान कार्यासाठी आयुष्य वेचलेल्यांचा परिचय करून देणारे आहे.
२०२१ च्या महापुरानंतर नुकतेच पुन्हा निर्माण केलेल्या वस्तुसंग्रहालयाला संस्थेने रामभाऊ साठे यांचे नाव देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला आहे. रामभाऊ साठे हे पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन यासाठीही जागरूक होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात आपण सगळे यासाठीही काम करूया. नगरपरिषदेचे प्रशासक विशाल भोसले यांनी लोटिस्माचे संग्रहालय प्रेक्षणीय झाले असून पर्यटकांनी व चिपळूणकरांनी आवर्जून पहायला हवे, असे सांगितले.
कै. रामभाऊ साठे सरांचे चिरंजीव व नामवंत विधिज्ञ श्री. मिलिंद साठे यांनी अतिशय सुंदर अशा संग्रहालयाला आम्हां साठे कुटुंबाचे वडील आणि शिक्षणक्षेत्रासाठी ज्यांनी आयुष्य वेचले त्यांचे नाव दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण कराल त्या कार्यक्रमाला आम्ही सहकार्य करू, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी केले. कै. साठे सरांच्या कार्याचा सविस्तर परिचय श्रीमती मनिषा दामले यांनी करून दिला. लोटिस्माचे कार्यवाह श्री. विनायक ओक यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला राष्ट्रपाल सावंत, मधुसूदन केतकर, अरुण इंगवले, प्रकाश घायाळकर, बापू काणे, सौ. संध्या साठे जोशी, धनंजय साठे, सौ. विद्या पेंडसे, उमेश जोशी, तसेच मालघरचे ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते.













