चिपळूण (प्रतिनिधी) : वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे आधुनिक उपचार पद्धतीने असाध्य वाटणाऱ्या अशुद्ध रक्तवाहिन्यांवर यशस्वी उपचार पायांवरील रक्तवाहिन्या फुगणे, वाकड्या- तिकड्या होणे, त्यामध्ये वेदना होणे, पायांना सूज येणे, जडपणा जाणवणे, तसेच बराच वेळ उभे राहिल्यानंतर त्रास वाढणे – ही अशुद्ध रक्तवाहिन्यांच्या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘व्हेरिकोज व्हेन्स’ असे म्हणतात.
या आजारामध्ये पायांमधील रक्त हृदयाकडे वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील झडपा योग्य प्रकारे कार्य करत नाहीत. त्यामुळे रक्त साचून रक्तवाहिन्या फुगतात व त्या त्वचेवर ठळकपणे दिसू लागतात. या आजारावर आता आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध झाली असून, त्यामध्ये लेसर किरणांच्या साहाय्याने खराब झालेली रक्तवाहिनी आतून बंद केली जाते. या उपचारपद्धतीमुळे मोठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता सहसा भासत नाही. कमी छेद देऊन, अतिशय कमी वेदनांमध्ये उपचार करता येतात. रुग्णाला लवकर चालता येते आणि दैनंदिन कामे पुन्हा सुरू करता येतात. अशाच प्रकारे अशुद्ध रक्तवाहिन्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णावर लेसर उपचारपद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या उपचारामुळे रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळत असून, अशा आजारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पर्माकॅथ बसविण्याची प्रक्रिया सुद्धा यावेळी करण्यात आली. मूत्रपिंडाचे कार्य कमी झालेल्या रुग्णांना शरीरातील अपायकारक घटक बाहेर काढण्यासाठी नियमित रक्तशुद्धीकरण (डायलिसिस) करावे लागते. या उपचारासाठी मानेतील किंवा छातीतील मोठ्या रक्तवाहिनीतून एक विशेष मऊ नळी बसविली जाते. या नळीला पर्माकॅथ असे म्हणतात. या नळीच्या साहाय्याने रुग्णांना वारंवार डायलिसिस उपचार घेणे सोयीचे होते. ही प्रक्रिया विशेष उपचार कक्षात आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने केली जाते. अशाच प्रकारे रुग्णालयात एका रुग्णावर पर्मकॅथ बसविण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या सुविधेमुळे मूत्रपिंडाच्या रुग्णांना नियमित उपचार घेणे अधिक सोयीचे होणार आहे.
या शस्त्रक्रियेचा एकूण ११ रुग्णांनी लाभ घेतला. व या सर्व रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले या योजने अंतर्गत मोफत उपचार मिळाले. या सर्व शस्त्रक्रिया इंटरव्हेनशनल रेडियोलॉजिस्ट डॉ. मनोहर कचरे व डॉ. नेताजी पाटील यांनी यशस्वी केल्या.













