सावंतवाडीतील ५७ कोटींच्या नळ पाणी योजनेचे काम आठ दिवसांत सुरू करा

अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालणार ; संजू परब यांचा इशारा

सावंतवाडी (प्रतिनिधी) :

सिंधुदुर्ग जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असून आगामी काळात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाच, सावंतवाडी नगर परिषदेची तब्बल ५७ कोटी रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी नळ पाणी योजना गेल्या सात महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प आहे. कंत्राटदाराकडे सर्व यंत्रणा सज्ज असतानाही हे काम नेमके कोणाच्या सांगण्यावरून आणि का बंद ठेवण्यात आले, याची स्पष्ट कारणे मुख्याधिकाऱ्यांनी जाहीर करावीत. येत्या आठ दिवसांत या योजनेचे काम पुन्हा सुरू न झाल्यास नगर परिषदेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी दिला आहे.

सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेवक अजय गोंदावळे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक तसेच शिवसेना पदाधिकारी बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

यावेळी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करताना संजू परब म्हणाले की, “सावंतवाडी शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ५७ कोटींची नळ पाणी योजना गेल्या सात महिन्यांपासून रखडली आहे, ही बाब अत्यंत क्लेशदायक आहे. ज्या भागात खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली होती, तेथे सध्या रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेता ही योजना वेळेत पूर्ण झाली असती, तर शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला असता.”

कंत्राटदाराकडे आवश्यक साहित्य आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध असतानाही, नगर परिषदेकडून नळ पाणी विभागाचे काम रोखून धरणे अजिबात योग्य नसल्याचे परब यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी योग्य आणि समाधानकारक उत्तरे देणे टाळले, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुढील आठ दिवसांत काम पूर्ववत सुरू करावे, अन्यथा शिवसेनेच्या वतीने नगर परिषदेवर धडक देत मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा ठाम इशारा संजू परब यांनी दिला आहे.